पुढील आठ दिवस थंडी कायमच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:28 AM2020-12-22T04:28:29+5:302020-12-22T04:28:29+5:30
हिंगोली: काश्मीर प्रदेशात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे सर्वत्र गार वारे व काही प्रमाणात थंडीही जाणवू लागली आहे. गार वारे व ...
हिंगोली: काश्मीर प्रदेशात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे सर्वत्र गार वारे व काही प्रमाणात थंडीही जाणवू लागली आहे. गार वारे व थंडी पुढील आठ दिवस राहील, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवामानशास्त्रज्ञ डॉ. कैलास डाकोरे यांनी दिली.
शीतलहरीमुळे उतरेकडील भागात थंडी पडली आहे. याबरोबरच मराठवाड्यातही ही थंडी जाणवू लागली आहे. रविवारी हिंगोलीचे तापमान कमाल २६ तर किमान ११ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. थंडी तसेच गार वारे हे अजून सात ते आठ दिवस राहील, अस अंदाज वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. ऑक्टोबर ते जानेवारी असे चार महिने थंडीचे असले तरी पहिल्या दोन महिन्यांत थंडी जाणवली नाही. १५ डिसेंबरपासून थंडी मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. थंडी बरोबरच बोचरे वारेही त्रासदायक होऊ लागले आहे. थंडीचा कडाका पाहता शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, अकोला बायपास, बसस्थानक,, नांदेड नाका, खटकाळी बायपास आदी परिसरात स्वेटर, मफलर, उलनचे कपडे विक्रेत्यांनी विक्रीसाठी ठेवली होती. गेल्या चार-पाच दिवसांपासून काश्मीर भागात बर्फवृष्टी सुरू आहे. या बर्फवृष्टीचा जिल्ह्याच्या वातावरणावर परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तापमानात अचानक घट झाली आहे. सध्या थंड वारे वाहत आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडत आहे. थंडी व गार वाऱ्यामुळे ताप, सर्दी, खोकला, डोके दुखणे आदी आजारांना सामोरे जावे लागत आहे.