शहरात रात्रीचा प्रवास धोक्याचाच; अनेक झुंडींनी घेतला रस्त्यांचा ताबा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:34 AM2021-09-15T04:34:46+5:302021-09-15T04:34:46+5:30
हिंगोली : शहरासह जिल्ह्यामध्ये मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी पहायला मिळत आहेत. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये भटक्या ...
हिंगोली : शहरासह जिल्ह्यामध्ये मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी पहायला मिळत आहेत. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये भटक्या कुत्र्यांनी ४ हजार ९९२ जणांना चावा घेतला आहे.
शहरातील बावन खोली, तिरुपतीनगर, एनटीसी परिसर, अकोला बायपास, जिजामातानगर, खटकाळी, मच्छीमार्केट, रेल्वे स्टेशन परिसर, बसस्थानक परिसरांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी पहायला मिळत आहेत. रात्रीच्यावेळी तर रस्त्याने चालणेही मुश्कील होऊन बसत आहे. दुसरीकडे वाहनचालकांना वाहने चालविणे कठीण होऊन बसत आहे. वाहनाच्या मागे हे भटके कुत्रे लागत असून यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे.
कुत्रे आवरा हो !
महिना चावा
जानेवारी ९२८
फेब्रुवारी ९०८
मार्च १००७
एप्रिल ४४२
मे ३७६
जून ३७४
जुलै ४३१
ऑगस्ट ५२६
या भागात जरा सांभाळून...
बावन खोली, एनटीसी मिल, बसस्थानक परिसर, रेल्वे स्टेशन परिसर या भागातून रात्रीच्यावेळी जात असाल तर सांभाळून जा. कारण या भागात भटके कुत्रे जास्त प्रमाणात आढळून येत आहेत.
कुत्र्यांची नसबंदी झालीच नाही...
गत पाच-सहा वर्षांपासून कुत्र्यांची नसबंदी काही झालीच नाही. यावर्षी कुत्र्यांची नसबंदी करण्यात येणार आहे, असे नगर परिषदेच्यावतीने सांगण्यात आले.
४४९७ ‘एआरव्ही’ इंजेक्शन उपलब्ध...
कुत्र्याने चावा घेतल्यानंतर त्या व्यक्तीस ‘एआरव्ही’ आणि ‘एआरएस’ हे इंजेक्शन दिले जाते. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात ‘एआरव्ही’ इंजेक्शन ४४९७ असून ‘एआरएस’ इंजेक्शन ९० आहे. एआरव्ही हे शासनाकडून मिळते तर एआरएस हे लोकस्तरावर खरेदी केले जाते.
आम्हांला चोराची नाही, कुत्र्याची भीती वाटते
यशवंतनगरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वेळोवेळी सांगूनही नगर परिषद या कुत्र्यांचा बंदोबस्त करत नाही. लहान मुलांच्या मागे हे कुत्रे लागतात.
-मुरली कल्याणकर, नागरिक
गत काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रात्री आठ वाजल्यानंतर हे कुत्रे रस्त्याच्या मधोमध बसतात. जवळून जाणाऱ्या वाहनांच्या मागेही लागतात.
-छोटू देशमुख, नागरिक
तोफखाना, बसस्थानक परिसर, औंढा रोड या भागात तर मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. नगर परिषदेचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.
-रविराज मुदिराज, नागरिक
सावधगिरी बाळगावी...
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मागील काही महिन्यांपासून वाढली आहे. येत्या काही दिवसांत कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे. नागरिकांनी रात्रीच्यावेळी भटक्या कुत्र्यांपासून सावध रहावे, असे आवाहन नगर परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.