एचआयव्ही पॉझिटिव्ह नऊ महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:25 AM2021-01-14T04:25:37+5:302021-01-14T04:25:37+5:30
हिंगोली : जिल्ह्यात एड्स जनजागृती कार्यक्रम राबविण्यासह प्रत्येक मातेची गरोदरपणात एचआयव्ही चाचणी अनिवार्य केली आहे. त्यातच ज्या आधीपासूनच ...
हिंगोली : जिल्ह्यात एड्स जनजागृती कार्यक्रम राबविण्यासह प्रत्येक मातेची गरोदरपणात एचआयव्ही चाचणी अनिवार्य केली आहे. त्यातच ज्या आधीपासूनच एचआयव्हीबाधित आहेत, अशांचे अपत्य बाधित जन्माला येऊ नये, यासाठी उपचार करण्यात येतात. त्यामुळे जिल्ह्यात ११ गरोदर मातांपैकी नऊ जणींनी निगेटिव्ह बाळास जन्म दिला, तर एक बाळ गर्भातच दगावले.
हिंगोली जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून एड्स निर्मूलन कार्यक्रम राबविला जातो. त्यात २००२ ते २०२० या काळात ३.३१ लाख जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ३८७८ जण बाधित आढळले, तर गरोदर मातांच्या तपासणीत ३.३० लाख चाचण्यांमध्ये २५५ जणी बाधित आढळल्या आहेत. बाधित असलेल्या महिला गरोदर राहिल्यास त्यांचे बाळही बाधित राहू नये, यासाठी एड्स नियंत्रण विभागाकडून विशेष औषधोपचार दिले जातात. ते वेळेत घेतल्यास बाळ निगेटिव्ह जन्माला येते. १८ महिन्यांपर्यंतच्या चाचणीत ते निगेटिव्ह आले तर ते सामान्य मानले जाते. मागील वर्षात दहापैकी नऊ बाळांची १८ महिन्यांपर्यंतची चाचणी निगेटिव्ह आली, तर एक बाळ बाधित आढळले.
गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी
एचआयव्हीबाधित महिला गरोदर असल्यास तिने वेळेवर औषधोपचार, योग्य आहार घेणे गरजेचे आहे, तर सहा महिने बाळाला अंगावर पाजले पाहिजे. नियमित तपासणी व आरोग्य विभागाचा सल्ला घेणेही आवश्यक असून, त्यामुळे बाळ निगेटिव्ह जन्माला येते.
एड्स नियंत्रण कार्यक्रमात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यात येते. पहिल्या गरोदरपणाच्या वेळी एचआयव्ही चाचणी बंधनकारक आहे. त्यामुळे नवे रुग्ण समोर येतात, तर जे बाधित आहेत, अशा मातांना निरोगी बाळ जन्माला यावे यासाठी औषधोपचार दिले जातात.
-उद्धव कदम, एड्स नियंत्रण अधिकारी