पाच गावांत नाही ब्लिचिंगचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:46 AM2018-02-26T00:46:58+5:302018-02-26T00:47:02+5:30
तालुक्यातील १०१ ग्रामपंचायती अंतर्गत पाच ग्राम पंचायतीमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापरच ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे पंचायत समितीचे गटविकास डॉ. अविनाश गायकवाड यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील १०१ ग्रामपंचायती अंतर्गत पाच ग्राम पंचायतीमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापरच ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे पंचायत समितीचे गटविकास डॉ. अविनाश गायकवाड यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
औंढा नागनाथ तालुक्यात बोअरवेल, नळयोजना, हातपंप, विहिरी अशा स्त्रोतातून पिण्याच्या पाण्यासह वापरातील पाण्याची व्यवस्था आहे. आगामी काळात तालुक्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कित्येक गावात कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कागदावरच आहेत. त्या योजनांचा निधी मात्र फस्त करण्यात आला आहे. तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायतींकडून ब्लिचिंग पावडरचा वापर करून पाणी स्त्रोतांचा वापर करीत आहेत. परंतु सेंदूरसना, गवळेवाडी, सारंगवाडी, गांगलवाडी, बर्र्गेवाडी या पाच ग्रामपंचायतीकडून ब्लिचिंग पावडरचा वापरच करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे त्या गावात निश्चितच दूषीत पाणी पुरवठा होत असणार, यात शंका बाळगण्याचे कारणच नाही. या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत आहे, हे एक न उलगडणारे कोडेच आहे. आता सर्वांत तीव्र पाणीटंचाई सर्वत्र निर्माण होणार असल्याने पिण्याचे पाणी मिळण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागणार त्यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. पाच गावात मात्र पिण्याच पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापरच होत नसल्याची बाब समोर आल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले.