ना रक्त तपासणी, ना सोनोग्राफी ; दोन टक्के महिला थेट प्रसूतीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:20 AM2021-06-23T04:20:23+5:302021-06-23T04:20:23+5:30
हिंगोली : जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना काळात गरोदर मातांची प्रसूतीपूर्व तपासणी करण्यासाठी विशेष काळजी घेतली आहे. त्यामुळेच वर्षभरात ...
हिंगोली : जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना काळात गरोदर मातांची प्रसूतीपूर्व तपासणी करण्यासाठी विशेष काळजी घेतली आहे. त्यामुळेच वर्षभरात तब्बल २२ हजार ४२२ मातांची चारवेळा तपासणी करण्यात यश आले आहे. मात्र तरीही कोरोना संसर्गामुळे दोन टक्के गरोदर मातांनी प्रसूतीपूर्व तपासणी करण्याकडे दुर्लक्ष केले.
जिल्ह्यात कोरोनामुळे लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वच जण आरोग्याची काळजी घेत आहेत. त्यामुळे विविध आजाराच्या तपासण्या करण्याकडे कल वाढला आहे. यात गरोदर माताही मागे नसून नियमित तपासणीला प्राधान्य दिले जात आहे. गरोदर मातांची आरोग्य तपासणी वेळेवर व्हावी, त्यांना सकस आहार मिळावा यासाठी अंगणवाडी ताई, आशा वर्कर, आरोग्य सेविकांमार्फत लक्ष ठेवले जात आहे. कोरोनामुळे गरोदर मातांच्या आरोग्य तपासणीवर परिणाम होईल, असे वाटत होते. मात्र आरोग्य विभागाने योग्य नियोजन लावल्याने जिल्ह्यातील तब्बल २२ हजार ४२२ गरोदर मातांची चार वेळा प्रसूतीपूर्व तपासणी केली. गरोदर मातांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ९७ टक्के असताना प्रत्यक्षात ९८ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. एकीकडे जवळपास ९८ टक्के गरोदर मातांची वेळेवर आरोग्य तपासणी करण्यात आरोग्य विभागाला यश आले असले तरी दोन टक्के गरोदर मातांनी कोणतीही तपासणी केली नाही. कोरोनामुळे घराबाहेर पडू नका, असे सांगितले जात होते. तसेच कोरोना काळात आरटीपीसीआर किंवा ॲटीजेन तपासणी केली जात होती. या तपासणीत पॉझिटिव्ह आढळल्याची भीती असल्याने दोन टक्के मातांचे प्रसूतीपूर्व तपासणीकडे दुर्लक्ष झाले असावे, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. दरम्यान, जिल्ह्यात शासकीय आरोग्य संस्थांमध्ये १० हजार १८२ मातांच्या प्रसूती झाल्या असून खासगी दवाखान्यात ५ हजार ३०६ प्रसूतीची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.
चाचणी आवश्यकच...
जननी शिशू सुरक्षा योजनेअंतर्गत प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान आणि प्रसूती पश्चात आरोग्य सुविधा, प्रयोगशाळा चाचण्या, औषधोपचार मोफत उपलब्ध आहेत. परंतु, तरीही काही गरोदर माता ९ महिन्यांत एकदाही रक्त तपासणी, सोनोग्राफी करत नाही. थेट प्रसूतीसाठी दाखल होतात. अशावेळी गरोदरपणातील गुंतागुंत आणि गर्भातील शिशूत असलेले व्यंग वेळीच समोर येत नसल्याची बाब चिंतादायक ठरत आहे. त्यामुळे प्रसूतीपूर्व तपासणी आवश्यकच असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
गरोदरपणाच्या ९ महिन्यांत चार ते पाच वेळा सोनोग्राफी केल्या जातात. यात १९ आठवड्यातील सोनोग्राफी महत्त्वाची ठरते. कारण त्यातूनच गर्भातील व्यंगदोष दिसून येतात. गरोदर महिलांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी नियमित तपासणीवर भर दिला पाहिजे.
-डॉ. रमेश कुटे, स्त्रीरोगतज्ज्ञ, हिंगोली
वर्षभरात शासकीय रूग्णालयात झालेल्या प्रसूती - १५५८२
किती बालकांना व्यंग - १ टक्का
किती टक्के महिलांनी आधी तपासणी केलीच नाही - २ टक्के