हिंगोलीच्या स्थानकात नाहीत सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:51 PM2019-01-17T23:51:44+5:302019-01-17T23:52:20+5:30
येथील बसस्थानकातील बसेसचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. आगारातर्फे नियोजन केले जात असले तरी, अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामांचा खोळंबा होत आहे. विशेष म्हणजे बस स्थानकाची नवीन इमारत उभी राहत असल्याने पर्यायी शेडच्या स्थानकात सुविधेअभावी प्रवाशांचे हाल होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील बसस्थानकातील बसेसचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. आगारातर्फे नियोजन केले जात असले तरी, अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामांचा खोळंबा होत आहे. विशेष म्हणजे बस स्थानकाची नवीन इमारत उभी राहत असल्याने पर्यायी शेडच्या स्थानकात सुविधेअभावी प्रवाशांचे हाल होत आहेत.
हिंगोली येथील बस स्थानकाच्या इमारतीचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. विशेष म्हणजे प्रवाशांसाठी आगारातीलच जागेत शेडमध्ये पर्यायी व्यवस्था म्हणून स्थानक उभारण्यात आले आहे. परंतु या ठिकाणी सुविधा नाहीत. त्यात पिण्याचे पाणीही उपलब्ध नसल्याने सर्व सामान्यांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागातील बसेस वेळेवर धावत नाहीत. तर लांब पल्ल्यावरील बस कधी मार्गावरून धावत आहेत, तर कधी ताळमेळ नाही, अशी गत झाली आहे. या कारभाराला मात्र हिंगोलीकर व बाहेरून येणारे प्रवासी मात्र वैतागले आहेत. शिवाय प्रवाशांतून संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. लोकमतने गुरूवारी बस स्थानकातील सुविधेसंदर्भात प्रवाशांशी संवाद साधला असता ते म्हणाले, बसस्थानकात सुविधा नाहीत. पिण्याचे पाण्याची सुविधा कोठे आहे दाखवा, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात होता. बसण्यासाठी जागा नसल्याने प्रवासी खाली बसत आहेत. स्वच्छतागृहातही अस्वच्छतेचे साम्राज्य असून बाजूच्या कामाची धूळही येत असल्याचे प्रवासी सांगत होते.
असुविधा : प्रवाशांच्या प्रतिक्रिया
रिसोड येथे जाण्यासाठी बसा स्थानकात दुपारी १२ वाजल्यापासून ताटकळत बसलो आहे. परंतु दीडतास होऊनही बस आलीच नाही. असे प्रवासी दीपक चिठ्ठे म्हणाले. तसेच स्थानकात सुविधा नसून याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
फाळेगाव येथे जाण्यासाठी जवळपास सव्वातास बसस्थानकात बसून आहे,अशी प्रतिक्रिया मारोती कुबडे या प्रवाशाने दिली. शिवाय स्थानकात बसण्यासाठी अपुरी जागा असल्याने खाली बसण्याशिवाय पर्याय नाही. असेही कुबडे म्हणाले.
अफरोज जहागीरदार म्हणाले हिंगोली येथील बस स्थानकात पिण्याचे पाणी नाही.
काही बस चालकांची बदली झाली, तर काही सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे चालकांचा तुटवडा आहे. परंतु नियोजन केले जात आहे.-आगारप्रमुख चौतमल.