वर्तनात सुधारणा होईना; तिघांना दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्याबाहेर हाकलले
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: August 12, 2023 03:18 PM2023-08-12T15:18:21+5:302023-08-12T15:19:11+5:30
गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे व हालचालीमुळे परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला होता.
हिंगोली: वर्तनात कोणतीही सुधारणा न करणाऱ्या व संघटितपणे गुन्हा करणाऱ्या तिघांना हिंगोली जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या बाबतचे आदेश काढले आहेत.
रमेश उर्फ रामा सुरेश गायकवाड (रा. गणेशपूर ता. वसमत), अनिल उर्फ बंडू भागोराव खंदारे (रा.मुडी ता. वसमत), राजू संभाजी करवंदे (रा. मुडी ता. वसमत) असे हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध सेनगाव, कळमनुरी (जि. हिंगोली) , लिंबगाव (जि. नांदेड) पोलिस ठाण्यात ३ गुन्हे दाखल असून ते संघटितपणे गुन्हे करीतच आहेत. त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नव्हता. गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे व हालचालीमुळे परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध कलम ५५ महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेळके यांच्या मार्फत पोलिस निरीक्षक आर.व्ही. भोईटे यांनी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे सादर केला होता.
या प्रस्तावाची पडताळणी करून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तिघांनाही पुढील दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्याबाबतचे आदेश काढले आहेत. दरम्यान, सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालकांसह टोळीने गुन्हेगारी करणाऱ्याविरूद्ध कारवाईची कडक भूमिका पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी घेतली आहे.