तपासणीचा पत्ता नाही; ई-पास नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:30 AM2021-04-25T04:30:06+5:302021-04-25T04:30:06+5:30
तपासणीचे निर्देश जिल्ह्याच्या प्रत्येक सीमेवर चेकपोस्ट उभारून त्या ठिकाणी प्रवासी वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक राकेश कलासागर ...
तपासणीचे निर्देश
जिल्ह्याच्या प्रत्येक सीमेवर चेकपोस्ट उभारून त्या ठिकाणी प्रवासी वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिले आहेत.
ज्यांच्याकडे ई-पास आहे, अशांनाच जिल्ह्यात प्रवेश देता येणार आहे. अन्यथा इतरांना सीमेवरून परत पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ऑक्सिजन, गंभीर रुग्ण, वैद्यकीय सेवा सुविधा आदींचीच जास्त चौकशी न करता त्यांना जिल्ह्यात अथवा जिल्ह्याबाहेर जाण्याची मुभा देण्याचे निर्देशही कलासागर यांनी दिले आहेत.
हिंगोली- वाशिम मार्ग
हिंगोली ते वाशिम मार्गावर कनेरगाव नाका याठिकाणी गेल्या वर्षी पोलिसांनी चेक पोस्ट उभारले होते. यंदा कनेरगाव नाका पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारीच स्थानिक व इतर वाहनांचीही तपासणी करीत आहेत. मात्र, चेक पोस्टप्रमाणे प्रत्येक वाहनांची तपासणी होत नाही. त्यामुळे अनेक वाहने बिनदिक्कतपणे फिरत आहेत. पलीकडे वाशिमच्या चेकपोस्टवरून अनेक वाहने परत हिंगोली जिल्ह्यात येतानाही दिसत आहेत.
वसमत - नांदेड मार्ग
हिंगोलीवरून वसमतमार्गे नांदेडला जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी वसमत फाटा येथे असणारी चेकपोस्टही अजून उभी राहिली नाही. त्यामुळे जिल्ह्यात प्रवेश करणे अतिशय सोपे आहे. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ दिसत आहे.
हिंगोली-नांदेड
हिंगोली नांदेड मार्गावर हिवरा पाटी येथे उभारण्यात येणाऱ्या चेकपोस्टवर गेल्या वर्षी अनेकदा वाहने परत पाठविली जायची. यंदा या ठिकाणी काहीच नाही. पोलीसही नसल्याने येथून बिनदिक्कतपणे वाहतूक सुरू आहे. त्याचा फायदा घेत अनेक वाहने नांदेड जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत.