कोविड सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाच नाही इन्शुरन्स!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:24 AM2021-05-03T04:24:12+5:302021-05-03T04:24:12+5:30
जिल्ह्यात एकूण २४ कोविड केअर सेंटर आजमितीस कार्यरत आहेत. यामध्ये बीएएमएस आणि एमबीबीएस डाॅक्टर, स्पेशालिस्ट, स्टाफ नर्स आदींचा समावेश ...
जिल्ह्यात एकूण २४ कोविड केअर सेंटर आजमितीस कार्यरत आहेत. यामध्ये बीएएमएस आणि एमबीबीएस डाॅक्टर, स्पेशालिस्ट, स्टाफ नर्स आदींचा समावेश आहे. या सर्व कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ८१२ अधिकारी-कर्मचारी आहेत. यामध्ये स्थायी कर्मचारी ३०० तर कंत्राटी कर्मचारी ५१२ आहेत. २३ मार्च २०२० मध्ये कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला. आतापर्यंत १२ कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या इन्शुरन्सबाबत शासनाने काही सूचित केलेले नाही. त्याबाबत शासनाची सूचना आल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही इन्शुरन्स काढला जाईल, असे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.
काय म्हणतात कर्मचारी...
कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहेत. शासनाने आमचा विचार करून आम्हाला शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे.
- आरती गायकवाड, स्टाफ नर्स, हिंगोली
कोरोना रुग्ण बरे व्हावेत, हा आमचा मुख्य उद्देश आहे. आम्ही आज कंत्राटी असलो तरी प्रामाणिकपणे सेवा देत आहोत. शासनाने आमचा वेळीच विचार करुन शासकीय सेवेत कायमस्वरूपी करावे.
- अपसाना शाह, स्टाफ नर्स, हिंगोली
रात्र दिवस न पाहता रुग्णांची सेवा करत आहोत. कधी- कधी साप्ताहिक सुटीच्या दिवशीही येऊन रुग्णांना औषधोपचार देताे. शासनाने आमचा इन्शुरन्स काढून शासकीय सेवेत सामावून घ्यावे.
- दीक्षा वाठोरे, स्टाफ नर्स, हिंगोली
सद्य:स्थितीत ज्या स्थायी कर्मचाऱ्यांना सुविधा आहेत, त्या सर्व सुविधा कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही देण्यात येत आहेत. सध्या तरी शासनाने इन्शुरन्सबाबत काही सूचना केलेल्या नाहीत. सूचना आल्यास त्याप्रमाणे विचार केला जाईल.
- डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली