विनानंबर, ट्रिपल सीट आढळल्यास होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:27 AM2021-09-13T04:27:53+5:302021-09-13T04:27:53+5:30
हिंगोली : शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत असून आता विनानंबर प्लेट, विना ...
हिंगोली : शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत असून आता विनानंबर प्लेट, विना पासिंग, ट्रिपलसीट वाहन चालविणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई केली जाणार आहे. १३ सप्टेंबरपासून ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविली जाणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिली.
हिंगोली शहरात मोटार वाहन, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांची संख्या वाढत आहे. वाहनावर नंबर न टाकता वाहन चालविणे, वाहनाची पासिंग न करणे, ट्रिपल सीट जाणे, मोबाईलवर बोलणे, राँग साईडने वाहन चालविणे, सीट बेल्ट न बांधणे, तसेच मोठ्या आवाजाचे सायलेंसर वापरणे आदी प्रकार आढळून येत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, गरोदर माता, लहान मुलांना कर्णकर्कश आवाजाचा त्रास होत आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी वाहतूक शाखेला दिल्या आहेत. त्यावरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नंबरप्लेटवर वाहनाचा क्रमांक स्पष्ट दिसेल असा वाहनाचा टाकावा, ट्रिपलसीट जाऊ नये, वाहन चालविण्याचा परवाना जवळ बाळगावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी केले आहे. १३ सप्टेंबर पासून हिंगोली शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर व्यापक स्वरूपात कारवाई केली जाणार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.
मोबाईलमधील कागदपत्रे धरली जाणार ग्राह्य
वाहनधारकांनी वाहनाच्या कागदपत्रांच्या प्रती मोबाईलमध्ये ठेवल्या तरी त्या ग्राह्य धरल्या जाणार आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हिंगोली शहरातील बिरसा मुंडा चौकात सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी अचानक वाहनांची तपासणी सुरू केली होती. यात अनेक वाहने विनानंबरप्लेटची आढळून आली होती.