कोरोना चाचणीसाठीही कुणी येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:28 AM2021-05-22T04:28:18+5:302021-05-22T04:28:18+5:30
हिंगोली जिल्ह्यात आता कोरोनाचा कहर ओसरू लागला आहे. अजूनही अपेक्षित प्रमाणात रुग्णसंख्या खाली आली नाही. मात्र चाचण्या घटल्याचे दिसून ...
हिंगोली जिल्ह्यात आता कोरोनाचा कहर ओसरू लागला आहे. अजूनही अपेक्षित प्रमाणात रुग्णसंख्या खाली आली नाही. मात्र चाचण्या घटल्याचे दिसून येत आहे. सध्या नागरिक घराबाहेर पडत नसल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाल्याने, चाचण्या घटल्या, की नागरिकांनी यासाठी टाळाटाळ चालविली, हे कळायला मार्ग नाही. काही दिवसांपूर्वी शहरात फिरते पथक, जिल्हा रुग्णालय व साठे वाचनालय अशा तीन ठिकाणी चाचण्या होत होत्या. शिवाय प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या चाचण्या वेगळ्या असायच्या. आता चाचण्यांची केंद्रेही सगळीकडेच कमी झाली आहेत. एखाद्या गावात जास्त रुग्ण आढळले की, तेथेच कॅम्पही लावला जात होता. तोही प्रकार आता बंद झाला आहे. एवढेच काय, तर जिल्हा रुग्णालयातील केंद्रही बंद पडले आहे. एकट्या साठे वाचनालयातील केंद्रावरूनच तपासण्या होत आहेत. या ठिकाणी अँटिजन व आरटीपीसीआर अशा दोन्ही प्रकारची चाचणी होत आहे. मात्र मध्यंतरी चाचणीची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंतच असल्याने अनेकांना त्यानंतर आल्यावर चाचणीसाठी केंद्र शोधत फिरण्याची वेळ येत होती. आता केंद्र असले तरीही, त्याची वेळ तीच कायम असल्याने तीननंतर एखादा रुग्ण आला, तर त्याची चाचणी करायला दुसरा दिवसच उजाडतो. त्यातही आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब दिला, तर आणखी एक ते दोन दिवस वाया जातात. अँटिजन चाचणीतच रुग्ण बाधित आढळला, तर निदान व उपचार तरी वेळेवर सुरू होतात. या सर्व प्रकारामुळे चाचण्या कमी होत आहेत. तसेच त्यामुळेच तर रुग्णसंख्या घटली नाही ना? या शंकेला वाव मिळत आहे. या केंद्राची वेळ वाढविण्याची गरज असून त्यामुळे कोरोनाचा कहर आणखी कमी करण्यात यश मिळणार आहे.