शिवसेना सोडणाऱ्या बेइमानांच्या मुलांना कोणी बायका देणार नाही : आ. संतोष बांगर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 03:57 PM2022-06-27T15:57:40+5:302022-06-27T15:58:33+5:30
आमदार संतोष बांगर यांनी आपल्या स्टाईलमध्ये बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला.
वसमत (जि.हिंगोली) : ज्या पक्षाने आमदार केले, त्या पक्षाला सोडून जाता, बेइमानी करता, अशा बेइमान लोकांचे काही भले होणार नाही. त्यांच्या बायका यांना सोडून जातील, या बेइमानांच्या मुलांना कोणी बायको देणार नाही. ते मुंजेच राहतील, अशा शब्दांत आमदार संतोष बांगर यांनी वसमत येथे भावना व्यक्त केल्या. त्यांची जीभ चांगलीच घसरली. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
शिवसेनेच्या विरोधात बंड करणाऱ्या आमदारांविरोधात रान पेटवण्यासाठी आणि शिवसेना कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी वसमत येथे संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, उपजिल्हाप्रमुख सुनील काळे, प्रल्हाद राखुंडे, कन्हैया बाहेती, काशीनाथ भोसले, राजू चापके, धनंजय गोरे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री मुंदडा यांनी पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेने भरभरून दिलेले असताना शिवसेनेसोबत बेइमानी करणे चुकीचे आहे. पक्षासोबत एकनिष्ठ राहणाऱ्यांनाच पक्षात व राजकारणात मान असतो, असेही त्यांनी सांगितले. आपण शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिलो. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मानाची पदे दिली. त्यामुळेच मान वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.
बंडखोरांच्या बायकासुद्धा त्यांना सोडून जातील
आमदार संतोष बांगर यांनी आपल्या स्टाईलमध्ये बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. स्वाभिमानाने जगा, असा सल्ला बंडखोर आमदारांना दिला. तर बंडखोरांचे काही चांगले होणार नाही. त्यांना नागरिक रस्त्याने फिरू देणार नाहीत. त्यांच्यावर सडके टमाटे, अंडे फेकतील. त्यांच्या तोंडाला काळे लावतील, असेही ते जोशात बोलण्याच्या ओघात बोलून गेले. एवढेच नव्हे, तर बंडखोरांच्या बायकासुद्धा त्यांना सोडून जातील. त्यांच्या लेकरांना कोणी मुली देणार नाही. ते मुंजे राहतील, असेही म्हटले. ईडीच्या भीतीनेही अनेक आमदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र माझ्यामागे अशी ईडी लावली असती तर तिला काडी लावली असती, असेही ते म्हणाले.