यावेळी माघार नाही; हिंगोलीत फुलमंडीतील अतिक्रमण हटवलं, अरुंद गल्ल्यांनी घेतला मोकळा श्वास
By विजय पाटील | Published: July 25, 2023 06:16 PM2023-07-25T18:16:22+5:302023-07-25T18:16:50+5:30
मागच्या वेळी या भागातून नगरपालिकेचे पथक वाद नको म्हणून परत गेले होते. आज मात्र ही अतिक्रमणे हटविली.
हिंगोली : शहरातील फुलमंडी भागातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपालिकेने २५ जुलै रोजी पुन्हा हाती घेतली आहे. त्यामुळे हा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
हिंगोली नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली होती. त्यातच रस्त्यावर हातगाडे, फलक लावणाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र आता परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांना हातगाड्यांच्या अतिक्रमणांनी घेरले आहे. रस्त्यालगत चिखल होत असल्याने काहींनी आपले बस्तान थेट रस्त्यावर आणले आहे. आधीच वाहतूक नियमांची एैसी तैशी करणाऱ्या हिंगोलीकरांचे यामुळे चांगलेच फावत आहे. अगदी उद्यानात पायी फिरत असल्यासारखे हातगाडे फिरवितात. त्यामुळे नागरिक वाहनांच्या वाहतुकीची शिस्त मोडतात. या सर्व प्रकाराकडे लक्ष देत न.प. व वाहतूक शाखेने संयुक्त मोहीम उघडणे गरजेचे आहे.
हिंगोलीत २५ जुलै रोजी फुलमंडी भागातील अतिक्रमण नगरपालिकेच्या पथकाने हटविले आहे. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या काही गल्ल्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. यात काही जणांच्या पक्क्या दुकानांना धक्का बसला आहे. मागच्या वेळी या भागातून नगरपालिकेचे पथक वाद नको म्हणून परत गेले होते. आज मात्र ही अतिक्रमणे हटविली.