ना सामाजिक अंतर, ना मास्क; तिसऱ्या लाटेची भीती वाटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:31 AM2021-08-26T04:31:44+5:302021-08-26T04:31:44+5:30
हिंगोली : कोरोना महामारीचा धोका टळला नसल्याचा इशारा नीती आयोगाने दिला आहे. तरीही, जिल्हा रुग्णालयातील अनेक ...
हिंगोली : कोरोना महामारीचा धोका टळला नसल्याचा इशारा नीती आयोगाने दिला आहे. तरीही, जिल्हा रुग्णालयातील अनेक ओपीडींबाहेर सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळात सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्हा रुग्णालयातील जवळपास १५ ओपीडी उघडण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेची वेळ दिलेली आहे. वरिष्ठ डॉक्टरांनी सूचना दिल्यानंतर काही दिवस ओपीडी वेळेवर उघडून डॉक्टर मंडळीही वेळेवर येतात. परंतु, नंतर मात्र ‘जैसे थे’ स्थिती निर्माण होते. कोरोना महामारीची दुसरी लाट संपल्यात जमा असताना अजूनही कोरोना धोका टळला नसल्याचा इशारा नीती आयोगाने दिला आहे. एवढे असताना जिल्हा रुग्णालयातील सर्वच ओपीडींमध्ये नोंद करण्यासाठी उभ्या असलेल्या रुग्णांना तसेच नातेवाइकांना सामाजिक अंतराचे भान नसल्याचे पाहायला मिळत आहे. दोन-चार जण सोडले तर अनेक जण रांगेत विनामास्कच उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. खरे पाहिले तर दवाखान्यातील ओपीडीच्या प्रमुखांनी रांगेत असलेल्या रुग्णांना तसेच नातेवाइकांना मास्क व सामाजिक अंतर ठेवण्यासाठी सूचना द्यायला पाहिजे. परंतु, तशा कोणत्याही सूचना दिल्या जात नाहीत. ओपीडीसमोर लागलेल्या रांगेवरून दिसून येत आहे.
एकाच सिटी स्कॅनवर चालतो गाडा...
जिल्हा रुग्णालयात दोन सिटी स्कॅन मशीन आहेत. एक मशीन जिल्हा रुग्णालयातील भागात आहे, तर एक मशीन रुग्णालयाच्या बाहेरील भागात आहे. बाहेरील सिटी स्कॅन मशीन १५ ते २४ ऑगस्टपर्यंत बंदच होती. त्यामुळे अनेक समस्यांना रुग्णांना सामोरे जावे लागले. बुधवारपासून ही सिटी स्कॅन मशीन सुरू झाली आहे. दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातील आतील भागातील सिटी स्कॅन मशीन वर्षभरापासून बंदच आहे. लवकरच दुरुस्त केली जाईल, असे जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले.
मशीन दुरुस्त झाली तरी सूचनाफलक कायम...
सिटी स्कॅन मशीन बारा दिवसांनंतर सुरू झाली आहे. परंतु, सिटी स्कॅन विभागाच्या काचेवर लावलेली ‘काही तांत्रिक कारणांमुळे सिटी स्कॅन मशीन बंद आहे’, ही सूचना अजूनही काढली नाही. त्यामुळे अनेक रुग्ण व नातेवाईक सूचना पाहून निघून जात आहेत. काहींना पैसे देऊन सिटी स्कॅन करावे लागत आहे, असेही रुग्णांनी सांगितले.
फोटो १ व २
प्रतिक्रिया
ओपीडीबाहेर गर्दी वाढत असेल तर ओपीडीच्या प्रमुखांनी रुग्णांना मास्क व सामाजिक अंतर ठेवण्याबाबत सांगणे आवश्यक आहे. याबाबत ओपीडीमधील सर्व डॉक्टरांना तशी सूचना दिली जाईल.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक