भाव नाही, पण बीपी वाढला; सोयाबीन पुढं शेतकरी रडला!

By रमेश वाबळे | Published: December 14, 2023 05:09 PM2023-12-14T17:09:33+5:302023-12-14T17:11:07+5:30

आठवड्यापासून सोयाबीन स्थिर; मोंढ्यात आवकही घटली, शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा

No value, but BP increased; The farmer cried next to soybeans! | भाव नाही, पण बीपी वाढला; सोयाबीन पुढं शेतकरी रडला!

भाव नाही, पण बीपी वाढला; सोयाबीन पुढं शेतकरी रडला!

हिंगोली : येथील मोंढ्यात पाच हजारावर गेलेले सोयाबीनचे दर क्विंटलमागे जवळपास तीनशेंनी घसरले. त्यामुळे आवक मंदावली असून, आठवड्यापासून असलेले स्थिर दर वधारण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. तर हळदीचा पडता भाव कायम आहे. ऑगस्ट, सप्टेंबरच्या तुलनेत क्विंटलमागे जवळपास दोन ते तीन हजाराची घसरण झाली आहे.

येथील बाजार समितीच्या मोंढ्यात सोयाबीनचे दर पाच हजारावर जात नसल्यामुळे शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण आहे. नवे सोयाबीन उपलब्ध होऊनही पडत्या भावामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केली नाही. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सोयाबीनने पाच हजाराचा पल्ला गाठला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. भाव आणखी वाढतील, अशी आशा असताना घसरले. १४ डिसेंबर रोजी सरासरी ४ हजार ७०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला. लागवड आणि उत्पादनात झालेली घट पाहता सध्याच्या भावात सोयाबीन विक्री करणे परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन विक्री केलेले नाही. परंतु, भाव केव्हा वाढतील, हे सांगणे कठीण आहे.

हळदीच्या बाबतीतही परिस्थिती वेगळी नसून ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये हिंगोलीच्या मार्केट यार्डमध्ये हळदीला सरासरी १५ हजार रुपये भाव मिळाला होता. मागील दोन महिन्यांपासून मात्र सरासरी ११ ते १२ हजाराखाली भाव मिळत आहे. हळदीच्या दरात जवळपास तीन हजारांची घसरण झाल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची निराशा होत आहे. हळद आणि सोयाबीनच्या भाववाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

उत्पादनात घट आणि पडते भाव...
पावसाच्या लहरीपणाचा फटका यंदा सोयाबीन पिकाला सर्वाधिक बसला. त्यातच पीक ऐन भरात असताना येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. किमान भाव तरी समाधानकारक मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, पाच हजारांचा पल्लाही गाठत नसल्यामुळे लागवडही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. किमान सहा हजार रुपये तरी भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे.

६५० क्विंटल सोयाबीन विक्रीला...
येथील मोंढ्यात दरवर्षी या दिवसात सरासरी एक ते दीड हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी येते. यंदा मात्र उत्पादनात झालेली घट आणि पडत्या भावामुळे आवक मंदावली आहे. गुरुवारी केवळ ६५० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. किमान ४ हजार ५०० ते कमाल ४ हजार ९१७ रुपये भाव मिळाला.

हळद उत्पादकांसह व्यापारीही चिंतित...
ऑगस्ट, सप्टेबरमध्ये सरासरी १५ हजार रुपये क्विंटलने विक्री झालेल्या हळदीला आता मात्र ११ ते १२ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. यात उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शिवाय ज्या व्यापाऱ्यांनी चढ्या दरात हळद खरेदी केली त्यांनाही नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांतही चिंता व्यक्त होत आहे.

Web Title: No value, but BP increased; The farmer cried next to soybeans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.