उद्योग नसलेला ‘हिंगोली’ जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:49 AM2019-02-06T00:49:41+5:302019-02-06T00:50:12+5:30
जिल्ह्यातील वाढत्या बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नाकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. सुविधांचा अभाव, भूखंड नसल्याने उद्योग सुरू होत नाहीत. तर जिल्ह्यात सुरू आहेत तेही उद्योग सध्या दुष्काळामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
दयाशिल इंगोले ।
हिंगोली : जिल्ह्यातील वाढत्या बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नाकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. सुविधांचा अभाव, भूखंड नसल्याने उद्योग सुरू होत नाहीत. तर जिल्ह्यात सुरू आहेत तेही उद्योग सध्या दुष्काळामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील आहे त्या उद्योगांनाच घरघर लागली आहे. दुष्काळामुळे पिके गेली शेतकरी हतबल झाला.त्यामुळे जिनींग व दालमिल अडचणीत आल्या आहेत. उद्योजकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागासलेल्या हिंगोली जिल्ह्याला ना उद्योग जिल्हा म्हणून घोषित केले होते. परंतु सध्या जिल्हा उद्योगात प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचे भासिवले जात आहे. एमआयडीसी व सहकारी औद्यागिक वसाहतीमधील भुखंडावर उभारलेले उद्योग अस्तीत्त्वात आहेत का? हेही सांगणे कठीण आहे. हिंगोली येथे २७३ पैकी २६६ भूखंड वाटप आहेत. येथे १९८ भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात मात्र केवळ ४० भूखंडावरच उद्योग उभारले आहेत. तर वसमत ४० पैकी ३८ भूखंड वाटप आहेत. येथे २२ भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र केवळ १० ठिकाणीच उद्योग सुरू आहेत. कळमनुरी ३२ पैकी १२ भूखंड वाटप असून एकाच ठिकाणी उद्योग आहे. हिंगोली येथील सहकारी औद्योगिक वसाहतमधील ६६ पैकी ६६ भूखंड वाटप केले आहेत. या ठिकाणी ३० भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे नोंद आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ८ भूखंडावर उद्योग सुरू आहेत.
असोसिएशनचा पाठपुरावा
जिल्ह्यातील उद्योगासंदर्भात येणाऱ्या अडी-अडचणी व समस्यांवर हिंगोली जिल्हा इंडस्ट्रीज असोसिएशन मागील अनेक वर्षांपासून लढा देत आहे. परंतु असोसिएशनच्या मागण्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचे असोसिएशनचे सचिव नंदकिशोर तोष्णीवाल यांनी सांगितले. उद्योग घटकांचा आकडा फुगविला जात असून भविष्यात याचे उद्योग व बेरोजगांवर विपरित परिणाम होणार असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे. बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करते. पुर्वी सामुहिक प्रोत्सहान योजना २००७ मध्ये भांडवली अनुदान एक रक्कमी मिळत असे. त्यामुळे उद्योगाला चालना मिळायची.