...तर बीडीओंचे पगार बंद करण्याची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:09 AM2019-04-27T00:09:39+5:302019-04-27T00:09:59+5:30
मग्रारोहयोत अनेक ग्रामपंचायतींनी एकही काम केले नाही. अशा गावांत या योजनेचे किमान एकतरी काम सुरू न झाल्यास बीडीओंचे पगार माझ्या परवानगीशिवाय करू नयेत, असे पत्र जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मग्रारोहयोत अनेक ग्रामपंचायतींनी एकही काम केले नाही. अशा गावांत या योजनेचे किमान एकतरी काम सुरू न झाल्यास बीडीओंचे पगार माझ्या परवानगीशिवाय करू नयेत, असे पत्र जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.
हिंगोली जिल्ह्यात सध्या मग्रारोहयोची कामे ५६३ पैकी २0८ ग्रामपंचायतीत सुरू आहेत. यात ५५२ कामांवर ८५२९ मजूर काम करीत आहेत. यात औंढ्यात २0 ग्रा.पं.च्या ४७ कामांवर ८५८, वसमतला २७ ग्रा.पं.च्या ५२ कामांवर ६९१, हिंगोलीत ५२ ग्रा.पं.च्या १२९ कामांवर २00१ मजूर, कळमनुरीत ५८ ग्रा.पं.च्या १७४ कामांवर २७१८ मजूर, सेनगावात ५१ गा.पं.च्या १५0 कामांवर २२६१ मजूर काम करीत आहेत. वन विभागाचीही औंढ्यात ५, हिंगोलीत ५, सेनगावात १३, कळमनुरी, वसमतला २ कामे सुरू आहेत. सामाजिक वनीकरणची वसमतला ५, कळमनुरीत ९ तर सेनगावात ४ कामे सुरू आहेत.
यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही अनेक ग्रामपंचायतीत कामे होत नाहीत, त्यामुळे ग्रामपंचायतींनी ही कामे करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या आहेत. जिल्ह्यात यंदा मग्रारोहयोच्या कामांवर दररोज दहा हजारांवर मजूर उपस्थिती गेली होती. आता त्यात घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी निवडणुकीमुळे मजुरांची संख्या रोडावली होती. त्यानंतर आता उन्हाची तीव्रता वाढल्याचा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र हाताला काम नसलेल्यांना सकाळी व सायंकाळी काम करणे शक्य आहे.
पाणंद रस्त्यांचीच कामे नको
ग्रामपंचायतींना कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या म्हणून त्यांनी केवळ पाणंद रस्त्यांची कामेच सुरू करू नयेत. आधी जलसंधारणाची कामे पूर्ण केल्यानंतरच पाणंद रस्त्यांच्या कामांचा विचार करण्यास सांगण्यात आले आहे.
पाच जणांना दणका
वारंवार सूचना देवूनही कामे करीत नसलेल्या पाच कंत्राटी कर्मचाºयांना कामावरून कमी करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्यास सांगण्यात आले. यात सेनगाव, हिंगोली व औंढ्यातील एक सहायक कार्यक्रम अधिकारी दोन तांत्रिक अधिकारी व दोन डाटा एन्ट्रि आॅपरेटरचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.