कळमनुरी तालुक्यात बोंडअळीच्या नुकसानीचे पंचनामे सादर न करणार्या कर्मचार्यांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 06:12 PM2018-01-03T18:12:57+5:302018-01-03T18:13:31+5:30
कापूस पिकावरील बोंडअळीसह धान पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण अहवाल तहसील कार्यालयात सादर न केलेल्या कळमनुरी तालुक्यातील २५ तलाठी सज्जांमधील १०५ तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी दिली.
कळमनुरी (हिंगोली ) : कापूस पिकावरील बोंडअळीसह धान पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण अहवाल तहसील कार्यालयात सादर न केलेल्या कळमनुरी तालुक्यातील २५ तलाठी सज्जांमधील १०५ तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी दिली.
कळमनुरी तालुक्यातील कापूस पिकावरील बोंडअळीसह धान पिकावरील रोगांच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश १२ डिसेंबर रोजी तहसीलदारांनी दिले होते. त्यानंतर पिकांवरील नुकसानीच्या पंचनाम्याचे सर्वेक्षण करून हा अहवाल १० दिवसाच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, २५ सज्जाच्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी अद्यापही अहवाल सादर केला नाही.
दरम्यान, २ जानेवारी रोजी तालुक्यातील मसोड, येहळेगाव (गवणी), घोडा, डोंगरगाव पुल, शेवाळा, वारंगा, शिवणी, कान्हेगाव, डोंगरकडा या १० दहा गावांचे अहवाल तहसील कार्यालयास प्राप्त झाले होते. संबंधित शेतकर्यांच्या शेतात जाऊन कापूस व धान पिकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देऊन संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आदेश देऊनही २० दिवसांचा कालावधी लोटला तरीही नुकसानींचे अहवाल सदर कार्यालयास प्राप्त झाले नाहीत.
त्यानंतर आता तहसीलदार यांनी संबंधित कर्मचार्यांना २४ तासांच्या आत केलेल्या पंचनाम्याचे अहवाल सादर करण्याच्या सूचना नोटिसीद्वारे दिल्या असून विलंब झाल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यात नमूद केले आहे.
त्याचप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन होत नाही, सदरची बाब ही गंभीर स्वरूपाची असून ही बाब खेदजनक असल्याचेही नोटिसीत नमूद केले आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या ३१ गावांतील पंचनाम्याचे अहवाल तहसील कार्यालयात सादर करण्यात असून अजूनही बर्याच गावांतील पिकांचे पंचनामे करण्याची कामे सुरू असल्याची माहिती आहे.
पंचनामे तात्काळ सादर करावेत
नुकसानीचे पंचनामे तात्काळ सादर करावेत, यासाठी तहसीलदारांनी १३ डिसेंबर रोजी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी बैठक घेऊन चार दिवसांच्या आता १८ डिसेंबरपर्यंत नुकसानीचा सर्वे सादर करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या होत्या. परंतु, १८ डिसेंबर रोजी चार दिवसांचा कालावधी लोटूनही पंचनाम्याचे अहवाल सादर करण्यात आले नसल्याने संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
नुकसानीचा सर्वे करताना सातबारावर त्या पिकांची नोंद असणे आवश्यक होते. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान व त्यापेक्षा कमी नुकसान तसेच क्षेत्र सर्व्हे नं. शेतकर्यांसह उभ्या पिकांचा फोटो शेतकर्यांची व पंचाची स्वाक्षरी तसेच तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकाच्या संयुक्त स्वाक्षरीने नुकसानीचा सर्व्हे सादर करण्याच्य सूचना देण्यात आल्या होत्या.