आता पणनकडे तूर डाळ मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:27 AM2018-05-21T00:27:24+5:302018-05-21T00:27:24+5:30
शालेय पोषण आहारासाठी पणन महासंघतर्फे तूर डाळीचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे जून २०१८ ते डिसेंबर २०१८ सहा महिन्यांसाठी लागणारी तूर डाळीची मागणी जिल्हा स्तरावरून मागविण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या मागणीप्रमाणे पुरवठा केलेल्या तूर डाळीची रक्कम वसुलीची जबाबदारी व्यवस्थापकीय संचालक म.रा.स. पणन महासंघाची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शालेय पोषण आहारासाठी पणन महासंघतर्फे तूर डाळीचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे जून २०१८ ते डिसेंबर २०१८ सहा महिन्यांसाठी लागणारी तूर डाळीची मागणी जिल्हा स्तरावरून मागविण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या मागणीप्रमाणे पुरवठा केलेल्या तूर डाळीची रक्कम वसुलीची जबाबदारी व्यवस्थापकीय संचालक म.रा.स. पणन महासंघाची आहे.
शासनाकडून पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. यासाठी लागणारी तूर डाळीचा पुरवठा आता थेट पणन महासंघतर्फे होणार आहे. सहा महिने पुरेल याप्रमाणे डाळीची मागणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागास दिल्या आहेत. त्यानुसार तालुका स्तरावरून मागणी केली जात आहे. आकडेवारी एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. शिक्षण विभागाकडे १७ मे रोजी वसमत तालुक्याचीच १७ हजार ९५५ क्विंटल तूर डाळीची मागणी आली. इतरांची येणे बाकी आहे. शाळा व विद्यार्थी पटसंख्येनुसार डाळीची मागणीच्या सूचना शासनाकडून आहेत.
दीड वर्षांनंतर आहारात तूरडाळ
तूर डाळीची भाववाढ झाल्याने मागील एक ते दीड वर्षांपासून शालेय पोषण आहारातून तूर डाळ बंद केली होती. काही शाळांमध्ये पुरवठा सुरू होता. परंतु नंतर तोही बंद केला. त्यामुळे तूर डाळीऐवजी मसूर व मुगाची डाळ समाविष्ट केली. जिल्ह्यातील जि. प. च्या १0३२ शाळांतून १ लाख ६३ हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो.
दरम्यान, रेशनवर ५५ रुपये किलोने हीच डाळ मिळत असताना पोषण आहाराला ७५ ते ८0 रुपये दर असल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.
तूर डाळीची आवक वाढल्यामुळे शेतकऱ्यांकडून कमी दराने डाळ खरेदी केली जात आहे. त्यामुळे शासनाकडून विविध योजनेअंतर्गत तुरीची खरेदी हमीभावाने करण्यात आली. राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत २५.२५ लक्ष क्विंटल तूर डाळ खरेदी केली आहे.
त्यामुळे आता शालेय पोषण आहार योजनेसाठी तूरडाळीचा पुरवठा केला जाणार आहे. शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागास तूरडाळीचा दर १ किलो ग्रॅम पॅकींगसाठी रक्कम ८० रूपये दराने व ५० कि.ग्रॅम पॅकिंगसाठी ७५ या प्रति कि.ग्रॅम दर असा आहे.
पणन महासंघाकडून शिक्षण विभागास सहा महिन्यांसाठी लागणारी तूरडाळ मागणीच्या सूचना शासनाकडून आहेत. त्यानुसार मागणीची प्रक्रिया सुरू असल्याचे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के म्हणाले.