आता फुटणार राजकीय अस्वस्थांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:18 AM2021-07-24T04:18:53+5:302021-07-24T04:18:53+5:30

जि.प.तील अपक्ष सदस्य तथा मागच्या विधानसभेला वंचितच्या माध्यमातून चुणूक दाखविणारे अजित मगर यांनी राष्ट्रवादीची चाचपणी केली. मात्र पक्ष पदाधिकाऱ्यांनी ...

Now the dilemma of political unrest will break | आता फुटणार राजकीय अस्वस्थांची कोंडी

आता फुटणार राजकीय अस्वस्थांची कोंडी

Next

जि.प.तील अपक्ष सदस्य तथा मागच्या विधानसभेला वंचितच्या माध्यमातून चुणूक दाखविणारे अजित मगर यांनी राष्ट्रवादीची चाचपणी केली. मात्र पक्ष पदाधिकाऱ्यांनी त्यास विरोध दर्शविला. अपक्ष म्हणून तग धरणे अवघड असल्याने ते काँग्रेसमध्येही जागा बनविण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र तेथेही तीच परिस्थिती आहे. आता नवे छत शोधायचे की वंचितलाच जिल्हाभर बळ देऊन नवा पर्याय द्यायचा यावर ते रणनीती आखत आहेत. वसमतमधील राजकीय धुमशान अजून सुरूच आहे. राष्ट्रवादीचे प्रल्हाद राखोंडे, राजेश पाटील इंगोले यांनी बैठक घेऊन शिवसेनेसाठीची चाचपणी केली. सेनेतून काहींचा विरोध असला तरीही या मंडळीचे सेनेलाच झुकते माप आहे. तर सेनेत सगळेच आलबेल नाही. जि.प. गटनेते अंकुश आहेर यांनी माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्याशी जाहीर पंगा घेतला. ते कामच करीत नसल्याचा आरोप केला. त्याला मुंदडा यांनीही नंतर चोख उत्तर दिले. राजू चापके यांना वसमत शहरातील एक गटही विरोध करू लागला आहे. त्यात नवी भरती होत आहे. वसमतमधील भाजपचे काही जि.प. सदस्यही नाराज आहेत. तेही सेनेचा बाणच हाती घेतील की काय? अशी चिन्हे आहेत. खरेतर, भाजप सक्रिय असती तर या मतदारसंघात इनकमिंगची संधी त्यांना सर्वाधिक होती. मात्र आउटगोईंग होत असेल तर श्रेष्ठींनी विचार करायला हवा. हयातनगर येथील जि.प. सदस्याच्या दिराने तर चापकेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत इरादेच स्पष्ट केल्याचे दिसते. राष्ट्रवादीच्याच रत्नमाला चव्हाण यांच्यावरील अविश्वासानंतर त्यांची नाराजी स्पष्ट आहे. आज ना उद्या ती प्रकट होईलच. फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा आहे. सेनगाव तालुक्यात भाजपच्या बळकटीकरणासाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी टाकलेल्या गळाला संजय कावरखे हे लागतील, असे दिसत आहे. त्यांनी सभापती निवडीच्या वेळी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला विरोध केला. खरेतर, नाराजीनंतरही पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची चिन्हे होती. मात्र त्यांनी पक्षाशी संपर्कच तोडल्याने हे घडले. हिंगोलीत भाजपमध्ये प्रकाश थोरात व आ. तान्हाजी मुटकुळे यांच्यातील वितुष्ट काल भाजप एकत्रित दिसल्याने संपुष्टात येईल, असे वाटत नाही. तसे झाले तर थोरात यांनाही वेगळा मार्ग पत्करण्याशिवाय गत्यंतर नाही. जि.प.तील माजी उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे व विठ्ठल चौतमल यांनीही आता हातावर शिवबंधन बांधले आहे. मात्र सभापती पदाच्या वेळी काँग्रेसचे दोन गट वेगवेगळ्या दिशांनी गेले. माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या गटाने पक्षाच्या उमेदवाराला साथ न दिल्याने त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव पाठविण्याचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी सांगितले. तर भाजपसोबत काँग्रेस कशी बसणार? असा गोरेगावकर गटाचा सवाल आहे. मात्र हा वाद आता पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. गोरेगावकर व सातव गटातील वाद मिटत नसल्याचा राजकीय फटका दोन्ही गटांना वारंवार बसत आला आहे. मात्र यावरून कुणी बोेध घेत नाही. यावरूनही काही जण अस्वस्थ आहेत. एकतर ते आपला वेगळा मार्ग पत्करतील, असे दिसते. माजी जि.प. सदस्य गजानन देशमुख यांचे उदाहरण यात देता येईल. तर अशांची जागा पटकावण्यासाठी इतर काही जण सज्ज आहेत. मात्र या दोन गटांतील वादामुळे कोणी धाडस करायला तयार नाही. माजी सभापती मुनीर पटेल यांनी काँग्रेसची चाचपणी केली. मात्र भाजपसारखीच येथे काँग्रेसचीही संथ पावले आहेत. तोपर्यंत त्यांनी वेगळा निर्णय घेतला तर नवल नाही. नगरपालिकांमध्येही अनेकांना पक्षांतराचे वेध लागलेले आहेत.

Web Title: Now the dilemma of political unrest will break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.