आता आषाढातही शुभमंगल सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:21 AM2021-07-16T04:21:19+5:302021-07-16T04:21:19+5:30
हिंगोली : कोरोना महामारीने सर्वांचेच गणित बिघडवून टाकले आहे. पूर्वी आषाढ महिना हा लग्नासाठी वर्ज्य मानला जायचा. परंतु, हल्ली ...
हिंगोली : कोरोना महामारीने सर्वांचेच गणित बिघडवून टाकले आहे. पूर्वी आषाढ महिना हा लग्नासाठी वर्ज्य मानला जायचा. परंतु, हल्ली आषाढ महिन्यातही विवाह कार्य होऊ लागल्याचे पाहायला मिळत आहे.
पूर्वी म्हणजे गत ४० वर्षांपूर्वी आषाढ महिना सोडून इतर महिन्यांमध्ये विवाहतिथी असेल तर ती काढून विवाहकार्य उरकून घेतली जायची. परंतु, हल्ली शास्त्राधाराला धरून तिथी काढली जात नाही, असेच दिसते. गत काही वर्षांपूर्वी आषाढ महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडायचा. त्यावेळेस पावसामध्ये विवाहकार्य करणे म्हणजे मोठे जिकरीचे होऊन बसायचे. ओढे - नाल्यांना पूर आला की, वऱ्हाडी मंडळींना विवाहस्थळी येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. विशेष सांगायचे झाल्यास त्यावेळेस विवाहकार्य करण्यासाठी आतासारखी मंगल कार्यालये नसायची. हेही कारण आषाढ महिन्यात विवाह कार्य न होण्यामागचे सांगितले जाते.
सद्यस्थितीत पाऊसपाणीही पूर्वीसारखे राहिली नाही. आजमितीस शहराच्या ठिकाणी व गावोगावी मंगल कार्यालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगल कार्यालय नसेल तर टेंट टाकून विवाह कार्य आटोपून घेतली जात आहेत. हल्ली नोकरीमुळे कुणालाही वेळ मिळत नसल्यामुळे तारीख पाहून विवाहकार्य आटोपून घेतले जात आहे. आषाढ महिन्याला ११ जुलै रोजी प्रारंभ झाला आहे. आषाढ महिन्यात १३, १८, २२, २५, २६, २८ आणि २९ अशा तारखा शुभ विवाहाच्या आहेत.
प्रतिक्रिया
आषाढ महिना हा शास्त्राप्रमाणे विवाह कार्यासाठी वर्ज्यच मानला जातो. परंतु, वधू-वरांच्या पित्यांनी विवाहाची तारीख विचारली तर सांगितली जाते. यावर्षी आषाढ महिन्यात ७ तिथी आहेत. पंचांगकर्त्यांनी दोन मुहूर्त काढले असून, यात मुख्यकाल आणि आपत्काल यांचा समावेश केला आहे.
- रेणुकादासगुरु कुलकर्णी, पुरोहित
शास्त्राप्रमाणे आषाढ महिन्यात विवाहकार्य करता येत नाही. पूर्वी आषाढ महिन्यात विवाहकार्य लावली जात नव्हती. आता मात्र आषाढ महिना न पाळता तारखेप्रमाणे विवाहकार्य आटोपून घेतली जात आहेत, असे पुरोहिताने सांगितले.
मंगल कार्यालय बुक...
कोरोना महामारी ओसरत चालली असली तरी कोरोनाच्या नियमात काही शिथिलता करण्यात आलेली नाही. कोरोनाचे नियम पाळत विवाह कार्य पार पाडणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वऱ्हाडी मंडळींना मास्क घालणेही आवश्यक आहे. याचबरोबर सामाजिक अंतर ठेवणे तितकेच गरजेचे आहे. मंगल कार्यालयात विवाहकार्य करायचे झाल्यास सर्व अटींची पूर्तता करावी लागेल, असे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत, असेही मंगल कार्यालयातून सांगण्यात येत आहे.
५० व्यक्तिनाच परवानगी...
कोरोना महामारी ओसरत चालली असली तरी शासनाने घालून दिलेले कोरोनाचे नियम मंगल कार्यालयांना पाळणे हे बंधनकारक केले आहे. वऱ्हाडी मंडळी ५० व्यक्तींपेक्षा अधिक असतील ते चालणार नाही, अशा सूचनाही मंगल कार्यालयांना दिल्या गेल्या आहेत. यामुळे बहुतांशजण विवाह हे घरीच साध्या पद्धतीने उरकून घेेत आहेत. मोकळी जागा असेल तर त्या जागेच्या मालकाकडून परवानगी घेतली जात आहे.
-