आता कांदा जाळून निषेध; नंतर केंद्रीय मंत्र्यांच्या घरात कांदे फेकू, ‘स्वाभिमानी’ ने दिला इशारा
By विजय पाटील | Published: August 23, 2023 03:43 PM2023-08-23T15:43:25+5:302023-08-23T15:46:48+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गोरेगाव येथील माँ जिजाऊ चौफुली चौकात कांद्याचे दहन करीत निषेध नोंदविण्यात आला.
हिंगोली : सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्काच्या धोरणावरून आक्रमक झालेल्या स्वाभिमानी संघटनेकडून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे २३ ऑगस्ट रोजी कांदे जाळून निषेध करण्यात आला. सदर निर्यात शुल्क मागे घ्या अन्यथा केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या दिल्ली येथील घरात कांदे फेकून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कांदा निर्यातीबद्दल सरकारने धोरण हाती घेत त्यामध्ये कांदा निर्यातीवरील ४० टक्के निर्यात धोरण राबवून सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे. शहरी भागातील मतदार पोसण्याकरिता शेतकऱ्यांना ४० टक्के निर्यात शुल्काचे धोरण लावीत शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गोरेगाव येथील माँ जिजाऊ चौफुली चौकात कांद्याचे दहन करीत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, रामेश्वर कावरखे, मदनलाल कावरखे, दशरथ मुळे, संतोष वैद्य सुरेश गावंडे, गजानन केंद्रेकर, नारायण देव, अशोक कावरखे आदींची उपस्थिती होती.