आता शिवसेनेचे खासदार 'नॉट रिचेबल'; हिंगोलीत हेमंत पाटलांच्या कार्यालयास सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 12:50 PM2022-07-19T12:50:26+5:302022-07-19T12:51:54+5:30

कालपर्यंत खा.हेमंत पाटील हे शिवसेनेच्या येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सावली देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. आता हे झाडच दुसऱ्याच्या अंगणात गेल्याने कार्यकर्त्यांची भ्रमनिराशा झाली.

Now Shiv Sena MP Not Reachable; Security at Hemant Patali's office in Hingoli | आता शिवसेनेचे खासदार 'नॉट रिचेबल'; हिंगोलीत हेमंत पाटलांच्या कार्यालयास सुरक्षा

आता शिवसेनेचे खासदार 'नॉट रिचेबल'; हिंगोलीत हेमंत पाटलांच्या कार्यालयास सुरक्षा

googlenewsNext

- विजय पाटील 
हिंगोली :
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खा.हेमंत पाटील यांच्या येथील कार्यालयास मंगळवारी सकाळपासूनच सुरक्षा देण्यात आली होती. त्यामुळे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र निर्माण झाले असून कालपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

खा. हेमंत पाटील कालपासून माध्यमांचे कॉल उचलत नसल्याने त्यांची नेमकी भूमिका समोर येत नव्हती. मात्र त्यांचे समर्थक त्यांच्या शिंदे गटात सामील होण्याबाबत संभ्रमात दिसत होते. खा.पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासमवेतच असल्याचे सांगत होते. मात्र जे आधीच शिंदे गटात गेले, त्यांनी खा.पाटीलही आमच्यासोबत असल्याच्या पोस्ट व्हायरल केल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून खा.पाटील यांच्या समर्थकांशी त्यांचा खटका उडाला. मात्र पाटील यांचे हे समर्थक तोंडघशी पडतील, असे चित्र आहे. 

राज्यात सत्तांतराचे नाट्य सुरू असताना कधीच खा.हेमंत पाटील यांच्या कार्यालयाला सुरक्षा नव्हती. त्यानंतर आ.संतोष बांगर यांनी शिंदे गट जवळ केला तेव्हाही नव्हती. आता मंगळवारी सकाळीच या कार्यालयासमोर बंदोबस्त लागण्याचे कारण कळायला मार्ग नाही. यावरून पाटील यांनी शिंदे गटात दाखला मिळविला असल्याचा कयास बांधला जात आहे.

कालपर्यंत खा.हेमंत पाटील हे शिवसेनेच्या येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सावली देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. आता हे झाडच दुसऱ्याच्या अंगणात गेल्याने कार्यकर्त्यांची भ्रमनिराशा झाली. शिवसेनेच्या येथील पदाधिकाऱ्यांना एकापाठोपाठ बसलेला हा दुसरा झटका आहे. त्यामुळे अनेकांनी आता संयमाची भूमिका घेतली आहे. काय बोलावे हेच अनेकांना सुचत नसल्याचे दिसते. टीका तर यापूर्वीही केली, वरिष्ठ नेतेही करीत आहेत. तरीही हे बंड शमत नसल्याने आहे त्या परिस्थितीत पुन्हा शिवसेनेला उभारी देण्यासाठी शांत डोक्याने काम करणे हाच पर्याय असल्याचे शिवसैनिकांना वाटत आहे.

बंडखोरीचा वेगळाच इतिहास
यापूर्वी हिंगोली जिल्ह्यात ज्यांनी बंडखोरी केली, त्यांनी पक्ष बदलला होता. आता ज्या आ.संतोष बांगर, खा.हेमंत पाटील यांनी बंड केले, त्यांनी पक्षप्रमुखांना डावलून शिवसेनेचाच दुसरा गट निवडला आहे. ठाकरे घराण्यावरील निष्ठा दाखविण्यासाठी अजून या लोकांच्या घरातील अथवा कार्यालयातील ठाकरे कुटुंबिय नेत्यांची छायाचित्रेही हटली नाहीत. वरून आम्हीच शिवसेना असल्याचा दावाही होत आहे. बंडखोरीचा हा वेगळाच इतिहास लिहिला जात आहे. भविष्यातच याचे खरे रुप समोर येणार आहे.

Web Title: Now Shiv Sena MP Not Reachable; Security at Hemant Patali's office in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.