आता मजुरी अदायगीलाही विलंबच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:21 AM2018-03-20T00:21:48+5:302018-03-20T11:34:13+5:30
वारंवार बदलणारे अधिकारी व कर्मचारी मग्रारोहयोतील मजुरांच्या मुळावर उतरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मजुरी मिळण्यास विलंब होत असल्याची बोंब वाढली आहे. आधीच कुशलच्या कामाचा निधी नसल्याने मग्रारोहयोतील कामांवर परिणाम होत असताना ही नवी समस्याही मजुरांची डोकेदुखी ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वारंवार बदलणारे अधिकारी व कर्मचारी मग्रारोहयोतील मजुरांच्या मुळावर उतरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मजुरी मिळण्यास विलंब होत असल्याची बोंब वाढली आहे. आधीच कुशलच्या कामाचा निधी नसल्याने मग्रारोहयोतील कामांवर परिणाम होत असताना ही नवी समस्याही मजुरांची डोकेदुखी ठरत आहे.
हिंगोली जिल्ह्यात साप्ताहिक मजूर उपस्थिती आता ३२ हजारांवर गेलेली आहे. काही तालुक्यांत मजूर या कामाकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचे दिसत आहे. कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजूर तर यापूर्वी काम न मिळाल्याने मजुरी भत्ता मिळावा व नव्याने काम मिळावे, यासाठी जिल्हा कचेरीसमोर पंधरा दिवसांपासून धरणे आंदोलन करीत आहेत. सहकुटुंब सुरू असलेल्या आंदोलनामुळे आंदोलनकर्त्यांना बाहेरच्यांची सहानुभूती मिळत असली तरीही प्रशासनासमोर मात्र कठीण प्रसंग आहे. सोळा दिवस झाले मात्र हा प्रश्न खरेच सुटेल की नाही, हे कळायला मार्ग नाही.
दुसरीकडे मजुरी मिळत नसल्याची बोंब कळमनुरी व सेनगाव तालुक्यात वाढली आहे. कळमनुरीत तर कधी बीडीओ, कधी सहायक बीडीओ, कधी लेखा विभागाचा कर्मचारी बदलला जातो. त्यामुळे त्यांच्या पाठशिवणीच्या खेळात मजूर हैराण आहेत. एकीकडे हे प्रकार सुरू असताना दुसरीकडे मजूर उपस्थिती व मग्रारोहयोतील खर्च यंदा वाढल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. या योजनेत अकुशल कामांवर जवळपास १४.६0 कोटी रुपये खर्च झाला. तर कुशल कामावर ५.२१ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये जवळपास १.३२ कोटी रुपये अजून अदा होणे बाकी असल्याचे सांगितले जात आहे. एकंदर यंदा जिल्ह्यातील काही भागात तरी मग्रारोहयोची कामे जोरात असून काही भाग अजूनही कामांच्या प्रतीक्षेतच असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात एकूण २२८ मस्टर १५ दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असून यात सर्वाधिक कळमनुरीत ११0 आहेत. यापैकी १0 जानेवारीचे, ९५ फेब्रुवारीचे आहेत. उर्वरित मार्चचे आहेत. तर आतापर्यंत औंढा-२३, हिंगोली-४0, सेनगाव-५५ अशी तालुकानिहाय संख्या आहे. कळमनुरी व सेनगावला कायम होणाऱ्या बदलामुळे डीएसीअभावी हे प्रकार वाढले आहेत.