एका ‘क्लिक’वर बघता येणार आता ग्रा.पं.ची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:38 AM2018-03-06T00:38:28+5:302018-03-06T00:38:41+5:30
कोणत्याही ग्रामपंचायतीचे काम केव्हाही आणि कोठेही पाहता यावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व माहिती फेसबुकवर अपलोड केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज एका क्लिकवर कुठेही बघता येणार आहे. यासाठी हिंगोली पं. स. कार्यालयाच्या सभागृहात ५ मार्च रोजी फेसबुकच्या व्हिलेज बुकचे प्रशिक्षण दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कोणत्याही ग्रामपंचायतीचे काम केव्हाही आणि कोठेही पाहता यावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व माहिती फेसबुकवर अपलोड केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज एका क्लिकवर कुठेही बघता येणार आहे. यासाठी हिंगोली पं. स. कार्यालयाच्या सभागृहात ५ मार्च रोजी फेसबुकच्या व्हिलेज बुकचे प्रशिक्षण दिले.
आता ‘ई’ग्रामच्या मदतीने ग्रामपंचायत स्तरावरील सर्व माहिती अद्ययावत ठेवण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामपंचायतीत होणारे सर्वच कामकाज या साईटवर अपलोड केले जाणार आहे. १ एप्रिलपर्यंत ‘पेपरलेस’ ग्रामपंचायतची संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठीचे एक पाऊल म्हणून हे प्रशिक्षण दिले. ग्रामस्तरावर होणारी कामे, त्याचा पूर्ण लेखाजोखा, इतर माहिती व त्याचे सर्व फोटो, व्हीडिओच्या माध्यमातून अपलोड करता येणार आहे. या प्रणालीमुळे जगातील कुठल्याही ग्रामपंचायतचे दैनंदिन कामकाज कोणालाही फक्ता एका क्लिकवर बघता येणार आहे.
प्रशिक्षणास उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, गटविकास अधिकारी आत्माराम बोंदरे, गुंजन काळे, जिल्हा समन्वयक प्रसाद लालपोतू यांची उपस्थिती होती. दरम्यान, प्रशिक्षक गंगाधर लोंढे यांनी ग्रामसेवकांना या साईटवर डाटा अपलोड करण्याचे प्रशिक्षण दिले. यामध्ये फोटो काढण्यापासून ते साईटवर अपलोड करण्याचे प्रात्यक्षिकही दाखविले.
या प्रणालीमुळे कोणत्याही ग्रामपंचायतीची माहिती काही क्षणात समजण्यास मदत होणार असून, आता शक्यतो ग्रामपंचायतीकडून माहिती घेण्यासाठी माहिती अधिकाराचा अर्जही टाकण्याची गरज पडणार नसल्याची चिन्हे असून ग्रामसेवकांचेही लिखानाचे कामकाज कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे यावेळी संबंधितांनी सांगितले.