हिंगोली जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटली; मात्र ऑक्सिजनची मागणी वाढतीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 05:57 PM2020-11-06T17:57:27+5:302020-11-06T17:58:56+5:30
हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत व कळमनुरी येथेच ऑक्सिजनवरील रुग्ण ठेवण्याची व्यवस्था आहे.
हिंगाेली : कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही सरासरी काढली तर दोन अंकाच्या आतच आले आहे. असे असले तरीही जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज मात्र कमी झाल्याचे दिसत नाही. सगळीकडे जंबो सिलिंडर बसवल्याचा परिणाम आहे की आणखी काही, हा संशोधनाचाच विषय आहे.
हिंगोली जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत मेपासून आऑक्सीजन सिलिंडरची गरज पडत होती. सुरुवातीला ऑक्सीजन सिलिंडर मिळण्याची अडचण होती. मात्र नंतर जालना येथील एका सप्लायरकडून पुरवठा सुरू झाला आणि तुटवड्याचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात मिटला होता. तरीही अधून मधून हिंगोली, वसमत व कळमनुरीत ऑक्सीजनचा तुटवडा असल्याच्या तक्रारी येतच होत्या. एकट्या हिंगोली रुग्णालयातच ७९५० सिलिंडर लागले आहेत. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या वाढली होती. तसेच गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढली होती. मात्र आता हे प्रमाण कमी असले तरीही हिंगोलीत तब्बल १८०० सिलिंडरची मागणी केली आहे. तर नवीन सिलिंडर बसविणे व ऑक्सिजनवर तब्बल २.४८ कोटी खर्च झाला आहे. याशिवाय व्हेंटिलेटर खरेदीचाही वेगळा खर्च झाला आहे. त्याचा नेमका आकडा रुग्णालयाकडून सांगण्यात आला नाही.
जालन्यातून होतोय ऑक्सिजन पुरवठा
हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत व कळमनुरी येथेच ऑक्सिजनवरील रुग्ण ठेवण्याची व्यवस्था आहे. त्यातही मनुष्यबळ व योग्य देखरेखीसाठी हिंगोलीत रुग्ण हलविला जातो. त्यामुळे येथेच सर्वाधिक पुरवठ्याची गरज आहे. आता तर तीन ते चार ठिकाणी महाजंबो सिलिंडर बसविले आहेत.