जिल्ह्यात टँकरची संख्या पोहोचली १८ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:19 AM2019-03-15T00:19:04+5:302019-03-15T00:19:23+5:30
पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली असल्याने आता टँकरची संख्या वाढली असून १८ वर पोहोचली आहे. तर अधिग्रहणांची संख्या १३0 वर गेली आहे. १0 गावे व २ वाड्यांना सध्या टँकर सुरू झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली असल्याने आता टँकरची संख्या वाढली असून १८ वर पोहोचली आहे. तर अधिग्रहणांची संख्या १३0 वर गेली आहे. १0 गावे व २ वाड्यांना सध्या टँकर सुरू झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात यंदा दुष्काळात होरपळणाऱ्या भागात जानेवारीपासूनच टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मात्र कुठे प्रादेशिक योजना तर कुठे नवीन योजना टंचाईतील उपाययोजनेच्या मुळावर येत असल्याचे चित्र होते. आता जसजशी ओरड वाढत चालली तशा टंचाईच्या उपाययोजनाही सुरू झाल्या आहेत. सध्या हिंगोली तालुक्यातील कनका व लोहगावसाठी ३, कळमनुरीत माळधावंडा, खापरखेडा, शिवणी खु. या तीन गावांसाठी ३, सेनगावात शहरासह जयपूर, कहाकर खु. या तीन गावांसाठी ८ टँकर, वसमतला बाभूळगावसाठी २ तर औंढ्यात रामेश्वर या गावासह संघनाईक तांडा व काळापाणी तांडा या दोन वाड्यांसाठी २ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
एकूण २६ हजार लोकसंख्या टँकरवर तहान भागवत आहे. यात सर्वाधिक १४ हजार ५७0 जणांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सेनगाव शहरामुळे या तालुक्यात टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १४ खाजगी तर ४ शासकीय टँकर सुरू आहेत. त्यावर एकूण ४६ खेपा मंजूर असून यात हिंगोलीत ७, कळमनुरीत ८, सेनगावात २१, वसमतला ५ तर औंढ्यात ५ खेपा मंजूर आहेत. अधिग्रहणांची संख्या आता १३१ वर पोहोचली आहे. यामध्ये टँकरसाठी ११ अधिग्रहणे केली असून उर्वरित गावांसाठी स्त्रोत म्हणून वापरले जात आहेत. यात हिंगोलीत १९, कळमनुरी २२, सेनगाव २८, वसमत ४३, औंढा नागनाथ १९ अशी तालुकानिहाय अधिग्रहणांची संख्या आहे.
इतर उपाययोजनांची पडताळणी
टंचाईतील योजनांच्या दुरुस्तीसह पूरक योजना, टँकरचे प्रस्ताव आदी बाबींची पडताळणी करण्यास उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेशित केले आहे. त्याची पडताळणी मागील पंधरा दिवसांपासून सुरू आहे. अद्याप त्याचा अहवाल आलेला नसल्याने हे प्रस्ताव तसेच आहेत. या कामांना ऐन टंचाईत विलंब होत आहे.