स्कॉलरशिपच्या तयारीसाठी आलेल्या विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांनी शिक्षकाला बदडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 07:29 PM2022-06-11T19:29:29+5:302022-06-11T19:30:17+5:30
शाळेतच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी बदडले
वारंगा फाटा (जि. हिंगोली) : तोंडापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकाला शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करताना पालकांनी पकडले. यानंतर बेदम चोप देत त्याला आखाडा बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना शुक्रवारी घडली.
सध्या सर्व शाळांना उन्हाळी सुटी लागली आहे; परंतु तोंडापूर येथील प्रभारी मुख्याध्यापक भगवान पंडितराव अवचार हा १० ते ११ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनींना नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षेच्या शिकवणीसाठी म्हणून शाळेत बोलवायचा. यावेळी उपस्थित मुलींपैकी दररोज एका मुलीला वेगळ्या वर्गखोलीत घेऊन जात विविध प्रकारे अश्लील चाळे करीत असे. याविषयी घरी सांगाल तर बघा, अशा धमक्या देत असे. हा प्रकार मागील बऱ्याच दिवसापासून सुरू होता.
हा प्रकार अखेर विद्यार्थिनींनी पालकांना सांगितला. त्यानुसार रोजच्या प्रमाणे सर्व मुली शाळेत आल्या. त्यानंतर शिक्षकाचा रोजच्या प्रमाणे शिकवणीऐवजी भलताच वर्ग सुरू झाला. हा प्रकार ग्रामस्थांनी पाहिला आणि रंगेहाथ पकडलेल्या गुरुजीला ग्रामस्थांनी चोप दिला. त्यानंतर या शिक्षकाला एका वर्गखोलीत डांबून ठेवून आखाडा बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती वारंग्याचे बीट जमादार शेख बाब यांनी दिली. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शनीचा भक्तही होता शिक्षक
हा शिक्षक मागील काही वर्षांपासून शनीचा भक्त बनला होता. काळे वस्त्र परिधान करून त्याने दाढीही वाढविली होती. मात्र, एका शिक्षकाचे बदललेले हे रूप ग्रामस्थांनी आधी धार्मिक वृत्ती समजून दुर्लक्षित केले. मात्र, आज घडलेल्या प्रकारानंतर हे कोणत्या संहितेत बसते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याला वेळीच आळा घातला असता तर कदाचित हा प्रकार घडला नसता, अशी चर्चा आता सुरू आहे.