तपासात दिरंगाई अंगलट आली; हिंगोलीत गुन्हे प्रलंबित ठेवणाऱ्या हवालदारावर गुन्हा
By विजय पाटील | Published: June 7, 2023 03:48 PM2023-06-07T15:48:02+5:302023-06-07T15:50:30+5:30
पोलिसांनी तपासकामात दिरंगाई केल्यास त्याचे काय परिणाम भोगावे लागू शकतात, हे पोलिस अधीक्षकांनी या कारवाईने दाखवून दिले आहे.
हिंगोली : मागील वर्षभरातील प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी अधिकारी व अंमलदारांना दप्तर तपासणीस बोलावले होते. मात्र त्याला गैरहजर राहून मुख्यालय सोडून गेलेल्या पोलीस हवालदारावर हिंगोली शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
६ जून रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात एक वर्षावरील प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दप्तर तपासणी लावली होती. त्यासाठी हिंगोली शहर ठाण्यातील पोलिस हवालदार साहेबराव गोविंदराव जाधव यांनाही बोलावले होते. मागील वर्षभरापासून अनेक गुन्हे प्रलंबित असल्याने त्यांना येथे हजर राहणे अनिवार्य होते. मात्र ते आले नाहीत. फोनवरून संपर्क साधला असता ते जाणीवपूर्वक कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडून गेल्याचे निदर्शनास आले. फिर्यादीला न्याय देण्याचे हेतूपुरस्सर त्यांनी टाळले. तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र ठेवणे हे त्यांचे कर्तव्य असताना आरोपीला सहाय्य करण्यासाठी तपास प्रलंबित ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. तर आकस्मात मृत्यूच्या घटनांतील मरणाचे कारण उघड होऊ नये म्हणून वरिष्ठांच्या सूचनाही डावलल्या. हे गुन्हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्याचे तक्रारीत म्हटले. याबाबत पोलिस निरीक्षक सोनाजी सूर्यभान आम्ले यांच्या तक्रारीवरून साहेबराव जाधव यांच्यावर शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तर अशाच प्रकरणात आम्ले यांच्या तक्रारीवरून पोलिस मुख्यालयातील कामाजी तुकाराम झळके या हवालदारावरही गुन्हा नोंद झाला.
पोलीस अधीक्षकांची कडक भूमिका
पोलिसांनी तपासकामात दिरंगाई केल्यास त्याचे काय परिणाम भोगावे लागू शकतात, हे पोलिस अधीक्षकांनी या कारवाईने दाखवून दिले आहे. त्यामुळे कामचुकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. हिंगोलीत पहिल्यांदाच अशी कारवाई झाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांना आता सतर्कता बाळगावी लागणार आहे.