एसआरपीच्या दोन गैरहजर जवानांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:00 AM2019-04-10T00:00:56+5:302019-04-10T00:01:13+5:30
लोकसभा निवडणूक बंदोबस्त टाळण्याच्या उद्देशाने राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक १२ येथील काही जवान जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले.
हिंगोली : लोकसभा निवडणूक बंदोबस्त टाळण्याच्या उद्देशाने राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक १२ येथील काही जवान जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अशा दोन जवानांविरूद्ध समादेशक सदानंद वायसे पाटील यांचे आदेशाने राज्य राखीव पोलीस बल अधिनियम १९५१ मधील कलम १४ व १५ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
सपोशि/४९० ए.जी. ठाकूर, नेमणूक डी कंपनी हे १२ नोव्हेंबर २०१५ ते ३० डिसेंबर २०१६ पावेतो (४२४) दिवस विनापरवाना गैरहजर होते. सदर कालावधीत महत्त्वाचे कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त व अतिमहत्त्वाचा लोकसभा निवडणूक बंदोबस्त टाळण्याचे उद्देशाने त्यांना नोटीस देवूनही ते कर्तव्यावर हजर झाले नाही. त्यामुळे समादेशक सदानंद वायसे पाटील यांचे आदेशाने राज्य राखीव पोलीस बल अधिनियम १९५१ मधील कलम १४ व १५ अन्वये पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गु.र.नं. १७१ २६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नापोशि ११०३ बंडू उत्तम कोकाटे नेमणूक प्रशासन कंपनी हे आंतर सुरक्षा बंदोबस्त लोकसभा निवडणूक बंदोबस्त, नक्षल बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त टाळण्याचे सवयीचे असल्याने त्यांना कर्तव्यावर हजर होण्यासाठी वेळोवेळी संधी दिली. तरीही आतापर्यंत ते कर्तव्यावर हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात ८ एप्रिल गुन्हा दाखल करण्यात आला.
सध्या लोकसभा निवडणूक संदर्भात बंदोबस्ताकामी नियोजन सुरू आहे. परंतु अशावेळीही गैरहजर राहिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले.