पोलीस अधीक्षक कार्यालय आमच्यासाठी मंदिरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:23 AM2021-06-04T04:23:04+5:302021-06-04T04:23:04+5:30
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी आरोग्य विभागासह पोलीस प्रशासनावर आहे. गुन्हे रोखण्यापासून ते कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २४ तास ...
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी आरोग्य विभागासह पोलीस प्रशासनावर आहे. गुन्हे रोखण्यापासून ते कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २४ तास सतर्क राहावे लागत आहे. त्यामुळे पोलिसांवर कामाचा ताणही वाढला आहे. अशातही आपल्या कामाशी प्रामाणिक राहून पोलीस सेवा बजावत आहेत. यातीलच एक कर्मचारी सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक बी.एस. शिंदे ३२ वर्षांपासून सेवा बजावत आहेत. वसमत, आखाडा बाळापूर, हिंगोली ग्रामीण, वसमत येथील उपविभागीय कार्यालय, नर्सी नामदेव पोलीस ठाण्यानंतर आता पोलीस अधीक्षक कार्यालयात कर्तव्य पार पाडत आहेत. विशेष म्हणजे ते मागील ३२ वर्षांपासून पायरीचे दर्शन घेऊनच पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रवेश करतात. त्यांच्या वडिलांनीही पोलीस खात्यात सेवा बजावली. त्यांच्याकडूनच पोलीस खात्याचे महत्त्व व प्रामाणिकपणाचे धडे मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले. जेथे जेथे ड्युटी असते तेथील पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या पायरीचे दर्शन घेतल्याशिवाय आतमध्ये प्रवेश करीत नाहीत. आताही नियमित पायरीचे दर्शन घेऊनच पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रवेश करतात. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, पोलीस ठाणे असो की पोलीस अधीक्षक कार्यालय हे माझ्यासाठी मंदिरच आहे. मंदिरात गेल्यानंतर मनाला जसे समाधान लाभते तसेच पायरीचे दर्शन घेऊन इमारतीत प्रवेश केल्यानंतर मनाला समाधान लाभत असल्याचे ते म्हणाले.
फोटो :