मायक्रोफायनान्स कंपनीचे अधिकारी वसुलीस गेले इकडे चोरट्यांनी कार्यालय साफ केले
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: April 29, 2023 03:29 PM2023-04-29T15:29:54+5:302023-04-29T15:37:29+5:30
सेनगाव येथील घटना : ७३ हजारांचे साहित्य लंपास
हिंगोली : सेनगाव येथील एका मायक्रोफायनान्स कंपनीतील ७४ हजारांचे साहित्य चोरट्यांनी साफ केले. ही घटना ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता उघडकीस आले. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात उशिरा २८ एप्रिल रोजी गुन्हा नोंद झाला.
सेनगाव येथे तारासना फायनान्स सर्विसेस प्रा.लि.चे कार्यालय आहे. येथे विजय डिगांबर गवई (रा. डोंगरकिनी ता. मालेगाव) हे शाखा व्यवस्थापक म्हणून काम पाहतात.कंपनीने महिला बचत गटाला दिलेल्या कर्जाच्या वसुलीचे कामही ते करतात. ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे गवई हे कार्यालयाचा दरवाजा ढकलून वसुलीसाठी गेले होते. दुपारी ३ वाजता ते परत आले असता कार्यालयातील प्रिंटर, लॅपटॉप, टॅबलेट, इन्व्हेंटर, बॅटरी, चाब्या, पंचिंग मशीन आदी ७३ हजार २०० रूपये किमतीचे साहित्य कार्यालयातून गायब झाल्याचे आढळून आले.
कार्यालयातील सर्वच साहित्य गायब झाल्याने कार्यालयात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती त्यांनी हरियाना राज्यातील वरिष्ठांना दिली. याप्रकरणी उशिरा २८ एप्रिल रोजी रात्री विजय गवई यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस अंमलदार सुभाष चव्हाण तपास करीत आहेत.