वृद्ध साहित्यिक, कलावंत निवड समिती रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:30 AM2021-04-27T04:30:45+5:302021-04-27T04:30:45+5:30
साहित्य, कला क्षेत्रात भरीव व दीर्घकाळ कामगिरी करणाऱ्या साहित्यिक व कलावंतांची उतरत्या वयात उपासमार होऊ नये, यासाठी शासनाच्या वतीने ...
साहित्य, कला क्षेत्रात भरीव व दीर्घकाळ कामगिरी करणाऱ्या साहित्यिक व कलावंतांची उतरत्या वयात उपासमार होऊ नये, यासाठी शासनाच्या वतीने मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निवडलेल्या कलावंतांच्या बँक खात्यात मानधन जमा केले जाते. या योजनेसाठी पात्र लाभार्थी दरवर्षी तालुकास्तरावर अर्ज सादर करतात. तालुकास्तरावरून हे अर्ज
समाजकल्याण विभागाकडे येतात. प्राप्त अर्जातून पात्र लाभार्थीची निवड जिल्हास्तरीय समिती करते. जिल्ह्यात केंद्र स्तरावरील वृद्ध साहित्यिक, कलावंताची संख्या १ आहे. तर राज्यस्तरावरील ५२ तर जिल्हास्तरावर निवडलेल्या कलावंतांची संख्या ५३० आहे. पात्र कलावंतांना दर महिन्याला मानधन दिले जाते. यातून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होते. मात्र मागील एक ते दीड वर्षापासून जिल्हास्तरीय निवड समितीच स्थापन झालेली नाही. त्यामुळे नवीन कलावंत निवडीची प्रक्रियाही थंडावली आहे. कोरोनाच्या काळात मानधन मिळेल, अशी अपेक्षा कलावंतांना होती. मात्र जिल्हास्तरीय निवड समितीच स्थापन नसल्याने वृद्ध कलावंत, साहित्यिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात समाजकल्याण अधिकारी एस.के. मिनगिरे यांच्याशी संपर्क साधला असता निवड समिती स्थापन करण्यासंदर्भात पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कलावंतांना मानधनाचीही प्रतीक्षा
निवड झालेल्या अ गटातील कलावंत, साहित्यिकांना ३१५० रुपयांचे मानधन दर महिन्याला मिळते. तर ब गटातील म्हणजे राज्यस्तरीय कलावंतांना २७०० तर जिल्हास्तरीय क गटातील कलावंत, साहित्यिकांना २२५० रुपयांचे मानधन दिले जाते. मात्र मार्च महिन्याचे मानधन रखडल्याची ओरड कलावंतातून होत आहे.