राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चा, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: October 28, 2022 07:04 PM2022-10-28T19:04:21+5:302022-10-28T19:08:32+5:30
यावेळी हजारो शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ५० खोके एकदम ओके आदी घोषणाही देण्यात आल्या.
हिंगोली : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी या व इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने २८ ऑक्टोबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ५० खोके एकदम ओके आदी घोषणाही देण्यात आल्या.
हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, शिक्षण व उद्योगासाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना सिविल स्कोरची अट लावू नये, पीकविमा द्यावा, शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, वन्य प्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, जिल्हा परिषद भरतीला मिळालेले स्टे उठवावा, तत्काळ पोलीस व सैन्य भरती घ्यावी, यासह इतर मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात राष्ट्रवादीचे माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू नवघरे, काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येंने सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेला मोर्चा महात्मा गांधी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी आमदार नवघरे, विधान परिषद सदस्या सातव, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. त्यांनी केंद्र, राज्य शासनाच्या धोरणाविरूद्ध सडकून टिका केली. त्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
आंदोलक-पोलिसांत झटापट
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरही पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आला असता आंदोलकांनी प्रवेशद्वार लोटत आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाली. यावेळी पोलिसांना दंडूका उगारावा लागला. पोलीस व आमदार नवघरे यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर आंदोलक शांत झाले.