श्रावणातील शेवटच्या सोमवारी नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच रांग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 05:11 PM2022-08-22T17:11:25+5:302022-08-22T17:14:25+5:30
मंदिरामध्ये जाणे व येण्याचा एकच मार्ग असल्याने दर्शनासाठी सहा सहा तासांचा वेळ लागत आहे.
औंढा नागनाथ ( हिंगोली) : येथील प्रसिद्ध असलेले आठवे ज्योतिर्लिंग नागनाथाच्या दर्शनासाठी शेवटच्या श्रावण सोमवारी भाविकांनी अलोट गर्दी केल्याने मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. भाविकांच्या पहाटेपासूनच एक किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मंदिर संस्थानकडून संस्थान सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आमदार संतोष बांगर, संस्थांचे अध्यक्ष तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली येथे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांच्यासह मंदिर कर्मचाऱ्यांनी भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. तत्पूर्वी रात्री एक वाजता पोलीस विश्वनाथ झुंजारे, व्यवस्थापक सुरेंद्र डफळे यांच्या हस्ते सपत्नीक नागनाथाची महापूजा करण्यात आली. यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे दार खुले करण्यात आले. दरम्यान, शेवटचा श्रावण सोमवार असल्याने राज्यासह परराज्यातूनही भाविक येथे मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
दर्शनासाठी सहा तासांचा वेळ
प्रचंड गर्दीत बम बम बोले, हर हर महादेवाच्या गजरात हजारो भाविकांनी प्रभू नागनाथाचे दर्शन घेतले. मात्र, मंदिरामध्ये जाणे व येण्याचा एकच मार्ग असल्याने दर्शनासाठी सहा सहा तासांचा वेळ लागत आहे. दर्शन लवकर होत नसल्याने अनेक भाविकांचा हिरमोड झाला.