परतवारी एकादशी निमित्त नर्सी येथे अवतरली अवघी पंढरी
By यशवंत भीमराव परांडकर | Published: July 13, 2023 11:42 AM2023-07-13T11:42:51+5:302023-07-13T11:44:55+5:30
भल्या पहाटेपासूनच भाविकांचे जत्थेच्या जत्थे मंदिराच्या दिशेने जात असल्याने संपूर्ण रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
- बापूराव इंगोले
नर्सी नामदेव (जी. हिंगोली):हिंगोली तालुक्यातील श्रीक्षेत्र असलेल्या संत नामदेवांच्या नर्सी नगरीत कामिका परतवारी एकादशी निमित्त १३ जुलै रोजी संत नामदेवांच्या दर्शनासाठी लाखो भाविक उपस्थित झाल्याने नर्सी येथे 'अवघी पंढरी' अवतरल्याचे चित्र दिसून येत आहे.
गुरुवारी भल्या पहाटेपासूनच भाविकांचे जत्थेच्या जत्थे मंदिराच्या दिशेने जात असल्याने संपूर्ण रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. दरम्यान, यावेळी मंदिर संस्थान कडून जय्यत तयारी करण्यात आली असून त्या अनुषंगाने बुधवारी हिंगोलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी नामदेव मंदिर येथे भेट देऊन मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्या विषयी योग्य त्या सूचना दिल्या.
यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रशांत देशपांडे,नर्सी ठाण्याचे सपोनि अरुण नागरे,संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी किर्तनकार,सचिव व्दारकादासजी सारडा, विश्वस्त,भिकुलाल बाहेती, गिरधारीलाल तोष्णीवाल,रमेश महाराज,राहुल नाईक, संजय देशमुख,उपसरपंच ज्ञानेश्वर किर्तनकार,आदि उपस्थित होते. संत नामदेवाचे जन्मस्थान व प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नर्सी या ठिकाणी कामिका परतवारी एकादशी निमित्त दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्या अनुषंगाने संस्थान व पोलिस प्रशासनाच्या वतीने देखील या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
गुरुवारी सकाळी ६ वाजता भिकुलाल बाहेती, भिकाजी कदम,ओमप्रकाश हेडा,यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी दर्शन बारीची व्यवस्था मंदिर परिसरात करण्यात आली आहे. आलेल्या सर्व भाविकांना चहा पाणी शाबूदाना खिचडी फराळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिर संस्थानच्यावतीने दोनशे स्वयंसेवक तसेच नर्सी पोलीस ठाण्याचे सपोनि अरुण नागरे यांचा ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.