एकीकडे ट्रॅक्टरचे धक्के तर दुसरीकडे असह्य प्रसवकळा; गर्भवतीचा मध्यरात्री चिखलातून प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 12:35 PM2022-08-22T12:35:29+5:302022-08-22T12:35:54+5:30
या वस्तीला जाण्या येण्यासाठी पक्का रस्ताच नाही. कोणत्याही लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष दिले नाही.
कळमनुरी (जि. हिंगोली) : तालुक्यातील जुनुना वस्तीला रस्ताच नाही. त्यामुळे येथील नागरिकांची मोठी अडचण निर्माण होत आहे. पावसाळ्यात तर रस्ता पूर्ण चिखलाने माखलेला असतो. या गावाला रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. २१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास प्रसुतीसाठी नेण्यासाठी चक्क ट्रॅक्टरनेच तीन किलोमीटर शेनोडी गावापर्यंत आणावे लागले. शेनोडी येथून रुग्णवाहिकेद्वारे महिलेला प्रसुतीसाठी कळमनुरी येथे आणले गेले.
जुनुना वस्ती ही मागील ५० वर्षांपासून वसलेली आहे. येथे दोनशेच्या जवळपास घरांची वस्ती आहे. ही वस्ती शंभर टक्के आदिवासी बहुल आहे. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असला तरी दुसरीकडे जुनुना गावाला जाण्यासाठी साधा रस्ताही नाही. ८ ऑगस्ट रोजी एका ओल्या बाळंतीणला रिमझिम पावसातून बैलगाडीतून कळमनुरीला आणावे लागले.
पुन्हा २१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास एका महिलेला शेनोडी रस्त्यापर्यंत ट्रॅक्टरने आणावे लागले. या वस्तीला जाण्या येण्यासाठी पक्का रस्ताच नाही. कोणत्याही लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष दिले नाही. निवडणुका पुरताच या वस्तीचा विचार केला जातो, निवडणुका गेल्यानंतर कोणीही ढुंकूनही या वस्तीकडे पाहत नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या गावाला जोडणारा पक्का रस्ताच नाही. पावसाळ्यात या रस्त्यावरून पायी चालता येत नाही. रस्त्यावर पाणी व चिखल जमा होतो. आजारी पडलेल्यांना व प्रसूतीसाठी महिलेला बैलगाडीनेच कळमनुरी येथे आणावे लागते. या गावाला पक्का रस्ता देण्याची मागणी बंडू भिसे, रामचंद्र भिसे, नारायण भिसे, गंगाराम भिसे, हिरामण भिसे, राजेश भिसे, रवी भिसे, रमेश भिसे, रामदास भिसे आदींनी केली आहे.