MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाचे धक्कादायक कृत्य; मावशीसमोरच घेतली कालव्यात उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 06:14 PM2023-06-26T18:14:56+5:302023-06-26T18:15:43+5:30
गावी जाताना अचानक पुलावर दुचाकी थांबवली, काही कळायच्या आत मावशी समोरच तरुणाची कालव्यात उडी
- रमेश कदम
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली): पुण्यात एमपीएससीची तयारी करणारा तरूण गावाकडे आला होता. आज सकाळी त्याने मावशीसमोरच इसापूर धरणाच्या कालव्यात उडी घेतल्याची खळबळजनक घटना घडली. पोलिस व गावकरी त्याचा शोध घेत आहेत. सूरज उत्तम माने (वय २५, रा. कान्हेगाव) असे कालव्यात उडी घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील पिंपरी शिवारात घडली.
सुरज माने हा अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी घेऊन पुण्यात एमपीएससीची तयारी करीत होता. अधून-मधून गावाकडे येत होता. काही दिवसांपूर्वीच तो गावाकडे आला होता. आज सकाळी त्याच्या मावशीला आखाडा बाळापूर येथे सोडण्यासाठी दुचाकीवर निघाला होता. त्याची दुचाकी कान्हेगावपासून काही अंतरावरील पिंपरी शिवारात आली असताना सूरजने अचानक कालव्याच्या पुलावर दुचाकी थांबवली. अचानक दुचाकी का थांबविली अशी विचारणा मावशीने केली. मात्र, काही कळण्याच्या आत कालव्याकडे धाव घेत सुरजने कालव्यात उडी घेतली.
सध्या कालव्यात पाणी असल्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पिंपरी व कान्हेगाव येथील ग्रामस्थानी घटनास्थळाकडे धाव घेतली. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार नागोराव बाभळे, विट्ठल जाधव यांच्या पथकाने दाखल झाले. पोलिस व गावकऱ्यांनी बेपत्ता सूरजचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, सुरजने कालव्यात उडी का घेतली, याचे कारण समजू शकले नाही. दुपारी उशिरापर्यंत त्याचा शोध सुरूच होता.