शिष्यवृत्तीच्या लाभासाठी पुन्हा एकदा संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:20 AM2018-05-08T00:20:42+5:302018-05-08T00:20:42+5:30
शाळा स्तरावर नूतनीकरण अर्जातील विद्यार्थ्यांची पडताळणी होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी मट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार होते. मात्र हे विद्यार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनातर्फे एनएसपी-२ या पोर्टलवर ७ ते १६ मेदरम्यान आॅनलाईन अर्ज पडताळणी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शाळा स्तरावर नूतनीकरण अर्जातील विद्यार्थ्यांची पडताळणी होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी मट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार होते. मात्र हे विद्यार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनातर्फे एनएसपी-२ या पोर्टलवर ७ ते १६ मेदरम्यान आॅनलाईन अर्ज पडताळणी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शिष्यवृत्ती २०१७-१८ करिता एनसपी-२.० या पोर्टलवर शाळा - संस्थांना अल्संख्याक विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन अर्ज पडताळणीस जिल्हा स्तरावर ३० नोव्हेंबर २०१७ शेवटची तारीख होती. परंतु संबंधित शाळेंच्या मुख्याध्यापकांनी शासनाने जाहीर केलेल्या विहित मुदतीत अर्ज पडताळणी करून घेतली नाही. त्यामुळे आता परत एकदा संधी दिली. अल्पसंख्याक मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती २०१७-१८ नूतनीकरण अर्ज शाळास्तरावर प्रलंबित आहेत, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तात्काळ १६ मेपर्यंत अर्ज पडताळणी करून घेण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षाणिकारी दीपक चवणे यांनी दिल्या आहेत. अल्पसंख्याक मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी अर्ज प्रक्रियेसाठी वेळोवेळी मुदतवाढ देऊनही कामे प्रलंबित आहेत. विद्यार्थी जर शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबधित यंत्रणेला जबाबदार धरले जाईल, यासंदर्भाचे पत्रही पाठविण्यात आले होते. परंतु याची दखल वेळीच घेतली गेली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार होते. मात्र आता विद्यार्थ्यांची नूतनीकरण पडताळणी केल्यास या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
जिल्ह्यातील ३० विद्यार्थ्यांची नूतनीकरण पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहावे लागणार होते. परंतु आता या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी तारखेत वाढ करण्यात आल्याने त्यांना याचा लाभ घेता येणार आहे. विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहिल्यास संबंधितांवर कार्यालयीन कार्यवाही केली जाणार आहे. शिवाय याबाबत पत्रही पाठविण्यात आले.