मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:31 AM2021-07-30T04:31:48+5:302021-07-30T04:31:48+5:30
हिंगोली : कोरोना महामारी कमी झाल्यामुळे लांबपल्ल्याच्या मुक्कामी बसेस सुरू केल्या आहेत; परंतु ग्रामीण भागातील मुक्कामी बसेसबाबत अजून शासनाचा ...
हिंगोली : कोरोना महामारी कमी झाल्यामुळे लांबपल्ल्याच्या मुक्कामी बसेस सुरू केल्या आहेत; परंतु ग्रामीण भागातील मुक्कामी बसेसबाबत अजून शासनाचा काही आदेश नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. शासनाचा आदेश आल्यास लवकरच ग्रामीण भागातील मुक्कामी बसेस सुरू केल्या जातील, असे महामंडळाने सांगितले.
एसटी महामंडळाच्या हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारांनी ग्रामीण भाग वगळता इतर लांब पल्ल्याच्या बसेस मुक्कामी पाठविणे सुरू केले आहे. कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागात बसेस पाठवता येत नाहीत, असे महामंडळाचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात मुक्कामी बसेस होत्या त्या वेळेस एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत होती. आज मात्र ग्रामीण भागात एकही बस मुक्कामी जात नाही. परिणामी, तोटा सहन करावा लागत आहे, असे महामंडळाने सांगितले. आजमितीस मुक्कामी बस नसल्यामुळे मिळेल त्या वाहनाने प्रवाशांना शहराच्या ठिकाणी जावे लागत आहे. मुक्कामी बस नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
५० टक्के बसेस आगारातच...
सद्य:स्थितीत कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागात मुक्कामी काय, तर कोणतीच बस सोडली जात नाही. आजमितीस फक्त लांब पल्ल्याच्या बसेस तेवढ्याच सुरू आहेत. शासनाचा आदेश आल्यास ग्रामीण भागात पूर्वीप्रमाणे मुक्कामी व इतर दिवसांच्या बसेस सुरू केल्या जातील. बसेस सुरू करण्याबाबत अजून तर आदेशच आला नाही.
ग्रामीण भाग वगळता मुक्कामी बसेस
हिंगोली ३०
१८
कळमनुरी १०
०५
वसमत २८
२५
रुग्ण घटले; एसटी कधी धावणार?
कोरोना महामारीचे रुग्ण घटले आहेत. मग एसटी महामंडळ ग्रामीण भागातील बसेस का सुरू करत नाही? हा प्रवाशांना पडलेला प्रश्न आहे. ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्यासाठी महामंडळाने शासनाकडे पत्रव्यवहार करायला पाहिजे; परंतु महामंडळ काहीच हालचाल करत नाही.
-मुरली कल्याणकर, कंजारा
कोरोनाअगोदर मुक्कामी बस होती. त्यामुळे शहराच्या ठिकाणी येणे सोयीचे होत होते; परंतु सध्या खाजगी वाहनाने शहराच्या ठिकाणी यावे लागत आहे. अशावेळी खाजगी वाहने अवाच्या सव्वा पैसे घेत आहेत. त्यामुळे नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
-पांडुरंग जाधव, सांडस
आदेश आल्यावर मुक्कामी बस सुरू...
कोरोना महामारीचे रुग्ण रोजच आढळून येत आहेत. त्यामुळे सध्यातरी ग्रामीण भागातील मुक्कामी बसेस सुरू करण्याचा कोणताही आदेश एसटी महामंडळाला आलेला नाही. शासनाच्या आदेशानुसार लांब पल्ल्याच्या बसेस सुरू असून, त्याच मुक्कामी आहेत. दरम्यान, चालक- वाहकांना कोरोना नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली