एचयुआयडी व स्टॉक डिक्लेरेशनच्या विरोधात सराफांचा एक दिवसीय बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:33 AM2021-08-24T04:33:20+5:302021-08-24T04:33:20+5:30
हिंगोली : एचयुआयडी व स्टॉक डिक्लेरेशन या जाचक कायद्याच्या विरोधात सराफ व सुवर्णकार असोसिएशनने सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद ...
हिंगोली : एचयुआयडी व स्टॉक डिक्लेरेशन या जाचक कायद्याच्या विरोधात सराफ व सुवर्णकार असोसिएशनने सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला. विविध मागण्यांचे निवेदन नंतर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (बीआयएस) हॉलमार्किंग युनिक आयडी अर्थात ‘एचयुआयडी’ द्वारे शुद्धता तपासणी पद्धतीमध्ये केलेल्या चुकीच्या व असंविधानिक बदलाच्या निषेधार्थ संपूर्ण भारतातील सराफा व सुवर्णकार व्यावसायिकांनी २३ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद ठेवून केंद्र शासनाचा निषेध केला. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने शुद्धतेचा स्टॅम्प दागिन्यांवर मारण्यासाठी हॉलमार्किंग कायदा अंमलात आणला. त्यावेळी देशातील सर्वच ज्वेलर्सने त्या कायद्याचे स्वागतच केले.
आतापर्यत त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली नाही. ‘बीआयएस’शुद्धतेच्या चार प्रमाणित शिक्क्यांमध्ये बदल करीत हॉलमार्किंग युनिक आयडीद्वारे शुद्धता तपासणीची चुकीची व असंविधानिक पद्धत आणली आहे. हे सर्व आणत असताना सुवर्णकारांच्या शिखर संस्थेला विश्वासात घेतले नाही, येणाऱ्या अडचणींवर चर्चा न करता बदल करण्यात आले. या पद्धतीमुळे ग्राहकांवर खर्चाचा अतिरिक्त भार पडणार आहे. या निषेधार्थ सराफा व सुवर्णकार असोसिएशनने एक दिवसाचा बंद पुकारला. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ, किशाेर साेनी, साईनाथ उदावंत, सुरेश सराफ, नागेश सराफ, श्रेयश खर्जूले, विजय सराफ, संजय टाक, संजय घन आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जिल्ह्यातील सर्वच दुकाने बंद..
जिल्ह्यातील हिंगोली १०० सेनगाव २०, कळमनुरी ४०, औंढा ३०, वसमत ८०, कनेरगाव २० आदी ठिकाणचे सर्वच सराफांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सर्व सराफांनी केंद्र शासनाच्या विरोधात निषेध नोंदविला.
फोटो नं.