हिंगोली जिल्ह्यातील १ हजार २३५ लोकांमागे एक पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:51 AM2021-02-05T07:51:53+5:302021-02-05T07:51:53+5:30
हिंगोली : अपुऱ्या पोलीस बळात व्हीआयपी बंदोबस्त, मिरवणुका, मोर्चे आदी सांभाळून जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागत ...
हिंगोली : अपुऱ्या पोलीस बळात व्हीआयपी बंदोबस्त, मिरवणुका, मोर्चे आदी सांभाळून जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागत आहे. पोलीस भरतीचा निर्णय गृहमंत्र्यांनी नुकताच घेतल्याने आता जिल्ह्यात पोलिसांची संख्या वाढून पोलिसांवरील ताण कमी होईल, असे वाटते.
राज्यामध्ये दोन टप्प्यांमध्ये १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे. सद्य:स्थितीत जगभरातील देशांचा विचार केल्यास भारत हा तळातील पाच देशांमध्ये आहे, तर देशात सर्वात चांगली स्थिती पंजाब राज्याची आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख ७८ हजार ९७३ एवढी होती. आता त्यात १ लाख ७९ हजार एवढी वाढ झाली असल्याचे सांगण्यात येते. म्हणजे, आजमितीस जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५७ हजार ९७३ एवढी झाली आहे. सद्य:स्थितीत लोकसंख्येच्या मानाने १२३५ लोकांमागे १ पोलीस बंदोबस्तासाठी येत आहे. जिल्ह्यात १३ पोलीस ठाणी असून २० पोलीस चौकी आहेत. सद्य:स्थितीत पोलिसांची संख्या ११०० आहे. अपुऱ्या संख्येमुळे जास्तीचे तास पोलिसांना सेवा बजवावी लागत आहे.
क्राईम रेटमध्ये हिंगोली जिल्हा ८ व्या स्थानावर
नॅशनल क्राईम ब्युरोने २०१२ या वर्षातील गुन्ह्याची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार क्राईम रेटमध्ये हिंगोली जिल्हा हा कमी दाखविण्यात आला असून आठव्या स्थानावर राहिला आहे.
जिल्ह्यात पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे आम्हाला दिवस-रात्र बंदोबस्तावर जावे लागते. लेकराबाळांची भेटही होत नाही. त्यामुळे प्रकृतीवर परिणाम होतो. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी करावी लागत आहे. व्हीआयपी बंदोबस्त, मिरवणुका, मोर्चे, आंदोलने, उपोषणे हे सर्व सांभाळून सद्य: स्थितीत आम्ही सेवा बजावत आहोत. यात गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हानही असते. त्यामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. कधी-कधी बंदोबस्त पार पडल्यानंतर गस्तीवरही जावे लागते, असे पोलिसांनी सांगितले.
सद्य: स्थितीत जिल्ह्यात पोलिसांची संख्या अपुरीच आहे. राज्य शासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे. भरती झाल्यानंतर पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदतच होणार आहे.
उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा, हिंगोली