शेतातून जाऊ देत नसल्याने एकाचा खून; अंधारवाडी शिवारातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 02:40 PM2023-11-03T14:40:57+5:302023-11-03T14:41:50+5:30
याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
हिंगोली : तुमच्या शेतातून आम्हाला का जाऊ देत नाही, या कारणावरून ५० वर्षीय व्यक्तीस लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून खून करण्यात आला. ही घटना हिंगोली शहराजवळील अंधारवाडी शिवारात १ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुरूवारी रात्री उशिरा पाच जणांविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
सोनाजी रामा डोम्पे (वय ५० रा. रिसाला बाजार हिंगोली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या आईच्या नावे अंधारवाडी शिवारात शेती असून त्यांचे कुटूंबिय शेती करतात. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सोनाजी डोम्पे व त्यांचा मुलगा देविदास डोम्पे हे दोघे शेतात होते. या वेळी त्यांच्या शेतातून पाचजण जात होते. त्यांना आमच्या शेतातून का जाता, शेतमालाचे नुकसान होत आहे, असे सोनाजी म्हणाले. शेतातून का जाऊ देत नाही या कारणावरून यातील चौघांनी लोखंडी रॉडने तर एकाने काठीने मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळही केली. या मारहाणीत सोनाजी डोम्पे यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी देविदास सोनाजी डोम्पे यांच्या फिर्यादीवरून भानुलाल उर्फ जम्मू नंदलाल यादव, विशाल उर्फ घामा मदनलाल यादव, राजू उर्फ पप्पू नागोराव भंडारे, बापुराव दशरथ डोम्पे (सर्व रा. रिसाला बाजार हिंगोली), रमेश जाधव (रा. पिंपळखुंटा) यांचेविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे, पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, पोलिस उपनिरीक्षक अशोक कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी दळवे तपास करीत आहेत.