खंजीर, गावठी कट्टा अन काडतूसासह एकजण बोल्डा शिवारातून ताब्यात
By विजय पाटील | Published: December 2, 2022 12:01 PM2022-12-02T12:01:58+5:302022-12-02T12:02:39+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची बाळापूर ठाणे हद्दीत कारवाई
आखाडा बाळापूर ( हिंगोली ): कुरुंदा ते बोल्डा रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास रात्रीच्या गस्तीदरम्यान एक संशयास्पद कार आढळून आली. पोलिसांनी तपासणी केली असता त्यातील व्यक्तीकडे एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आणि एक खंजीर आढळून आला. पोलिसांनी त्यास तत्काळ अटक केली असून सर्व शस्त्रे ताब्यात घेतली आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ डिसेंबर रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कुरुंदा ते बोल्डा रोडवर गस्ती घालत होते. यावेळी बोल्डावाडी शिवारात एक संशयास्पद कार (क्रमांक एम. एच. 13 -ए झेड ७१६१) आढळली. पोलिसांनी त्यातील व्यक्तीची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. गाडीची झडती घेतली असता पोलिसांना त्यात एक लोखंडी खंजीर आढळले. त्यामुळे त्या व्यक्तीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
पोलिसांनी तत्काळ गाडीसह त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. कैलास रमेश शिंदे (32, कवठा रोड, वसमत ) असे आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपींनवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर नांगरे करीत आहेत.