ओएनजीसीकडून पेट्रोलच्या शोधार्थ औंढ्यात सर्वेक्षण; वनशिवारात घेतले बोअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 06:00 PM2018-08-31T18:00:07+5:302018-08-31T18:07:56+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील चार गावांच्या वनशिवारात ओएनजीसी (आॅईल अॅण्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन) कडून अल्फा जिओ इंडियामार्फत पेट्रोल व इतर खनिजांबाबत सर्वेक्षण सुरू आहे.
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील चार गावांच्या वनशिवारात ओएनजीसी (आॅईल अॅण्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन) कडून अल्फा जिओ इंडियामार्फत पेट्रोल व इतर खनिजांबाबत सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील परिसरात बोअर घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
औंढा तालुक्यातील भोसी, ढेगज, सावळी बहिनाराव व वडचुना या गावांच्या परिसरात वनजमिनीवर हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. मागील तीन दिवसांपासून मशिनद्वारे बोअर घेतले जात आहेत. या ठिकाणच्या पाणी, माती व दगडांचे नमुनेही घेतले जात आहेत. या नमुन्यांच्या प्रत्यक्ष तपासणीनंतरच पेट्रोल अथवा खनिजाबाबतची माहिती कळणार आहे. प्रत्येक बोअर ६० फुट खोलीचा असून ६०० मीटरच्या अंतरात एक बोअर घेतला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३० ते ४० बोअर घेतले गेले आहेत.
याबाबत विभागीय वनाधिकारी केशव वाबळे म्हणाले, याबाबत पेट्रोलियम मंत्रालयाची परवानगी संबंधितांकडे आहे. वन विभागाच्या नियम व अटींचे पालन करून येथील वनसंपदेला बाधा न पोहचू देता हे सर्वेक्षण करण्यास परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले.या टप्प्यात चार गावे असून आणखी काही गावांच्या वनजमिनीवरही असेच सर्वेक्षण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.