जिल्हांतर्गत बदलीसाठी आॅनलाईन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:08 AM2019-05-30T01:08:29+5:302019-05-30T01:08:55+5:30
कळमनुरी : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी ग्रामविकास विभागाने ३० मेपासून शिक्षकांना बदल्याकरिता आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून ...
कळमनुरी : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी ग्रामविकास विभागाने ३० मेपासून शिक्षकांना बदल्याकरिता आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक कक्ष अधिकारी सं.ना. भंडारकर यांनी २९ मे रोजी काढले आहे.
बदलीपात्र शिक्षकांना बदलीसाठी ३० मेपासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत. बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या जिल्हा परिषदेने नोटीस बोर्डावर लावल्या आहेत. तसेच शिक्षकांचे मॅपिंग, रिक्त जागा संगणक प्रणालीमध्ये नमूद करण्यात आली आहे. संगणक प्रणालीमध्ये नमूद केलेली माहिती अपडेट करण्याची सुविधा ३० मे रोजी सकाळी ११ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बदली पोर्टलमध्ये आपले मोबाईल क्रमांक रजिस्ट्रर करावा. सीईओंनी संगणक प्रणालीमध्ये नमूद केलेली माहिती ओटीपी नमूद करून पाठविल्यानंतर तात्काळ संगणक प्रणालीद्वारे शिक्षकांना संवर्ग-१, संवर्ग-२, संवर्ग-३ व संवर्ग-४ अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिक्षकांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात वेगळी कार्यवाही करण्याची आवश्यकता नसल्याचेही परिपत्रकात नमूद आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व माहिती अंतीम करून शिक्षकांना बदलीसाठी अर्ज भरण्याची सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावी व आपल्या स्तरावरून शिक्षकांना कळविण्यात यावे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
३१ मे २०१९ रोजी १० वर्ष सेवा झालेले व सध्याच्या शाळेत ३ वर्षे सेवा झालेले शिक्षक बदलीस पात्र ठरणार आहेत. कार्यरत शिक्षकांची मॅपिंग करण्यात आली आहे. ३१ मे पूर्वी सेवानिवृत्त होणाºया शिक्षकांची मॅपिंग करण्यात येऊ नये, याबाबतचे परिपत्रकही यापूर्वीच काढण्यात आले होते. ३० मे पासून बदली पोर्टल सुरू होणार आहे. त्यामुळे बदली पात्र शिक्षकांची आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी नेट कॅॅफेवर गर्दी होणार आहे.