ऑनलाईन संभ्रम ! कोरोनाचा दुसरा डोस न घेताच लसीकरणाचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 06:01 PM2021-06-17T18:01:00+5:302021-06-17T18:01:00+5:30

कोविशिल्ड घेतलेल्या काही जणांना आता दुसरी लस घेतलेली नसतानाही तसा संदेश येत आहे. त्यामुळे अशांना आता दुसरी लस कशी मिळणार ? हा प्रश्नच आहे.

Online confusion! Certificate of vaccination without taking a second dose of corona | ऑनलाईन संभ्रम ! कोरोनाचा दुसरा डोस न घेताच लसीकरणाचे प्रमाणपत्र

ऑनलाईन संभ्रम ! कोरोनाचा दुसरा डोस न घेताच लसीकरणाचे प्रमाणपत्र

Next
ठळक मुद्देसात ते आठ जणांना आतापर्यंत असा संदेश आला आहे.

हिंगोली : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाल्यानंतर सुरुवातीला लस मिळत नसल्याची ओरड होती. आता लस आहे तर ती कुणी घ्यायलाच तयार नाही. दुसरीकडे हिंगोलीत काही जणांना लसीचा दुसरा डोस न घेताच तो दिल्याचे लसीकरणाचे प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त झाल्याने संभ्रम वाढत चालला आहे.

हिंगोली जिल्ह्यात लसीकरणात आतापर्यंत १ लाख ४८ हजार ७७८ डोस वापरले आहेत. यात १ लाख १४ हजार १७६ जणांना पहिला, तर यापैकी ३४ हजार ६०२ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. मात्र, दुसरा डोस घेण्यासाठी गत सहा महिन्यांत चार ते पाच वेळा निकष बदलले. सुरुवातीला २८ दिवसांनी, नंतर ४५ दिवसांनी, त्यानंतर ५६ दिवसांनी व दोन दिवसच ६२ दिवसांचा निकष होता. आता ८४ दिवसांचा निकष आला आहे. कोविशिल्ड ही लस घेणाऱ्यांसाठी असे बदललेले निकष दुसऱ्या डोसपासून वंचित ठेवणारे ठरले. मात्र, कोव्हॅक्सिनची लस घेतलेल्यांना आताही एक महिन्यानंतर दुसरा डोस दिला जातो. कोविशिल्ड घेतलेल्या काही जणांना आता दुसरी लस घेतलेली नसतानाही तसा संदेश येत आहे. त्यामुळे अशांना आता दुसरी लस कशी मिळणार ? हा प्रश्नच आहे.

सात ते आठ जणांना आतापर्यंत असा संदेश आला आहे. अशांची नेमकी संख्या किती, याचा शोध घेणे गरजेचे आहे. मात्र, अनेकांनी एकदा लस घेतली की पुन्हा नोंदणी करण्यासाठी काही दिवसांची मर्यादा पाळावी लागत आहे. त्यातच आता ८४ दिवस पूर्ण होताच अथवा ते पूर्ण होण्यापूर्वीच लसीचा दुसरा डोस घेतल्याचा संदेश येत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. ऑनलाईन नोंदणी करूनच लस दिली जाते. त्यामुळे असा प्रकार होणे अवघड आहे. मात्र, असे घडले असेल तर ते गंभीर आहे. याबाबत चौकशी केली जाईल. संबंधितांना दुसरा डोस देण्याची व्यवस्थाही होईल.

काही गोंधळ तर नाही
या नावांचा वापर करून इतरांना तर लस दिली नाही ना, अशी शंका घ्यायची तर सध्या ३८ हजार लस उपलब्ध असताना कोणी लसीकरणालाच येत नाही. त्यामुळे नेमका हा तांत्रिक गोंधळ आहे की, यामागेही काही रॅकेट आहे, हे कळायला मार्ग नाही.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकीत्सक

मी कोविशिल्ड लसीचा एक डोस घेतला आहे. मात्र, दुसरा डोस घेतला नसताना १३ जून रोजी दुपारी लस घेतल्याचा संदेश प्राप्त झाला. याबाबत आरोग्य विभागला कळविले आहे. आता हा डोस मिळणार की कसे? याची चिंता लागली आहे.
-डॉ. श्रीधर कंदी, हिंगोली

मी कोविशिल्डचा दुसरा डाेस घेतलेला नाही. मात्र, काही जणांना तसे संदेश आल्याचे कळाल्यानंतर ऑनलाईन तपासले असता दुसरा डाेसही दिल्याचे प्रमाणपत्र मिळाले.
- वर्षा धाडवे, हिंगोली
 

Web Title: Online confusion! Certificate of vaccination without taking a second dose of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.