मुद्रा लोनसाठी दिल्लीतून आला फोन, मंजुरीचे आमिष देऊन केली ऑनलाईन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 01:53 PM2020-03-14T13:53:34+5:302020-03-14T13:58:53+5:30
फाईल मंजूर झाल्याचे सांगत वेळोवेळी फोन करून पैसे मागितले
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : पंतप्रधान मुद्रा लोन मिळवून देण्याचे अमिष दाखवत डोंगरकडा येथील तरुणाची १ लाख ६ हजार ९३४ रुपयांची आॅनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध १३ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंजेश तुळशीराम इंगोले (२२, रा. शिरसाळा, तालुका मालेगाव, जि. वाशिम, हल्ली मुक्काम डोंगरकडा) या विद्यार्थ्यास गुडगाव हरियाणा येथून मंजीत महाटो याचा फोन आला. नवी दिल्ली येथून डीआयसी आॅफिसमार्फत बँक आॅफ बडोदा शाखा नवी दिल्ली येथून तुमचे मुद्रा लोन मंजूर करण्यासाठी कागदपत्रे पाठविण्याचे त्याने सांगितले.
त्यानंतर फाईल मंजूर झाल्याचे सांगत वेळोवेळी फोन करून २५ हजार, १० हजार, १८ हजार, २४ हजार, ३५ हजार व ३६ हजार असे एकूण १ लाख ६ हजार ९३४ रुपये गुडगाव हरियाणा येथील खात्यात भरायला लावले. नंतर कर्ज वगैरे काही मिळाले नाही. या प्रकरणी रंजेश इंगोले यांच्या तक्रारीवरून डीआयसी आॅफिस नवी दिल्ली येथील मिश्रा, बँक आॅफ बडोदा शाखा नवी दिल्ली येथील विजय मिश्रा व कोटक महिंद्रा फायनान्स सि. ए. मंजित महाटो असे नाव सांगणाऱ्या या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.