ग्रामीण भागातही आॅनलाईन खरेदीचे लोण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:07 AM2018-10-02T01:07:23+5:302018-10-02T01:07:39+5:30
काही दिवसांपूर्वी शहरी भागापुरतेच मर्यादित असलेले आॅनलाईन खरेदीचे लोण आता ग्रामीण भागातील वाडी, तांड्यापर्यंत पोहचले आहे. येथील बसस्थानक परिसरात विविध कंपन्यांचे कुरियर प्रतिनिधी दररोज ग्राहकांचे पार्सल वितरित करताना दिसून येतात. यामधून महिन्याकाठी तालुक्यात तीन ते पाच लाखांच्या खरेदीचा व्यवहार होत असल्याचे कुरियर प्रतिनिधीने सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : काही दिवसांपूर्वी शहरी भागापुरतेच मर्यादित असलेले आॅनलाईन खरेदीचे लोण आता ग्रामीण भागातील वाडी, तांड्यापर्यंत पोहचले आहे. येथील बसस्थानक परिसरात विविध कंपन्यांचे कुरियर प्रतिनिधी दररोज ग्राहकांचे पार्सल वितरित करताना दिसून येतात. यामधून महिन्याकाठी तालुक्यात तीन ते पाच लाखांच्या खरेदीचा व्यवहार होत असल्याचे कुरियर प्रतिनिधीने सांगितले.
दोन वर्षांत वाढलेल्या स्मार्टफोनच्या संख्येमुळे दुर्गम भागात इंटरनेट पोहोचले. मोबाईलच्या माध्यमातून थेट ग्रामीण भागातील पोस्टल कोडवर विविध वस्तूंचे वितरण व वस्तू परत घेण्याची सुविधा कंपन्यांकडून दिली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही आॅनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. पूर्वी काही ठराविक वस्तू आॅनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांना आता केंद्र शासनाच्या किरकोळ क्षेत्रातील गुंतवणुकीस सकारात्मक भूमिकेमुळे व कुरियर कंपन्यांच्या जाळ्याचा फायदा दिसतो. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक व चैनीच्या वस्तूंबरोबरच किराणा, कटलरी, होजिअरी कपडे, पादत्राणे, किचनमध्ये लागणाºया वस्तू, औषधी, पुस्तके या विविध वस्तूंची किरकोळ विक्री ग्रामीण भागापर्यंत शक्य झाली आहे.
छापील किंमतीच्या ५० टक्क्यांपर्यंत कमी किंमती व परत करण्याच्या सोप्या पद्धतीमुळे आॅनलाइन कंपन्या ग्राहकांना भुरळ घालत आहेत. अनेक उत्पादनांचे वेगवेगळे प्रकार घरात बसून बघता येतात. आॅनलाईन साईट म्हणजे मालाचे आभासी गोदामच. तिथे हवी ती वस्तू ग्राहकांना विकत घेता येते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत गरजेच्या प्रत्येक वस्तूंचे भांडार तळहातावरील स्मार्टफोनमध्ये विसावल्यामुळे आॅनलाईन खरेदी करणे सोपे झाले आहे. याचा सर्वात मोठा फटका येथील स्थानिक बाजाराला बसत आहे. एरवी ग्राहकांच्या गर्दीने फुलणाºया बाजारात सण-उत्सवाच्या काळातही शुकशुकाट दिसून येत आहे.