हिंगोली जिल्ह्यात आॅनलाईनचा गवगवाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:22 AM2018-01-25T00:22:05+5:302018-01-25T00:23:38+5:30
सातबारापासून ते फेरफार व इतर सर्वच बाबी आॅनलाईन करण्याचा शासनाचा मानस अजूनही पूर्णत्वास गेला नाही. एकीकडे सातबाराचे ८0 टक्के काम झाल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्षात ब-याच ठिकाणचे सातबारा मिळत नाहीत. मिळाले तर चुकीचे मिळतात. भूमिअभिलेखचे तर अजूनही स्कॅनिंगच पूर्ण झाले नाही. त्यामुळे सगळेच मुसळ केरात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सातबारापासून ते फेरफार व इतर सर्वच बाबी आॅनलाईन करण्याचा शासनाचा मानस अजूनही पूर्णत्वास गेला नाही. एकीकडे सातबाराचे ८0 टक्के काम झाल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्षात ब-याच ठिकाणचे सातबारा मिळत नाहीत. मिळाले तर चुकीचे मिळतात. भूमिअभिलेखचे तर अजूनही स्कॅनिंगच पूर्ण झाले नाही. त्यामुळे सगळेच मुसळ केरात आहे.
जिल्ह्यात ई-म्युटेशनचे काम गतीने करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बरीच मेहनत घेतली. हे काम न करणाºया अनेक तलाठ्यांना कारवाईचा झटकाही सोसावा लागला. मात्र त्यानंतर तेथे आलेल्या नव्या तलाठ्यांवरही कारवाईची वेळ येते की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकांनी तीन ते चार महिन्यांपासून रजिस्ट्रीसह कागदपत्रे घेवूनही आॅनलाईन फेरफार व सातबाराची कामे केली नसल्याचे दिसून येत आहे. यावर महसूल प्रशासन मात्र काहीच कारवाई करायला तयार नाही. उलट आपल्या कर्मचाºयांच्या चुका झाकून ज्यांचे आॅनलाईन काम व्हायचे आहे, अशांनाच त्रास देण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे.
भूमिअभिलेखने जिल्ह्यातील एकूण ४३३३७ मिळकतींच्या डाटा एन्ट्रीचे काम पूर्ण झालेले आहे. मिळकत पत्रिका, आॅनलाईन फेरफाराबाबत युनिकोड कर्न्व्हजन, गोलू क्लिनिंग, डीबीए टू आदी पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाल्याचा अहवाला भूमिअभिलेख विभागाने दिलेला आहे. तर लावकरच विभागातील संपूर्ण मिळकत पत्रिका महाभूलेख व वेबसाईटवर उपलब्ध होतील, असेही सांगण्यात आले. यामध्ये तहसील, दुय्यम निबंधक, भूमिअभिलेख कार्यालय एकमेकांशी जोडून आॅनलाईन फेरफार पद्धती कार्यान्वित केली जाणार असल्याचे अनेक दिवसांपासून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात त्याचा अंमल कधी होणार हा मात्र प्रश्नच आहे.
ई-मोजणी आज्ञावलीची कामे केवळ शासकीय कामांसाठीच केली जात असल्याचे दिसून येत आहे. यात ५९५ प्रकरणांत मोजणी झाली. तर आणखी शंभराच्या आसपास विविध प्रकरणे भूमिअभिलेख विभागाकडे आल्याचे सांगितले जाते.
स्कॅनिंगसाठी नवी कंपनी नेमली
भूअभिलेख विभागाच्या दस्तांचे स्कॅनिंग करण्यासाठी यापूर्वी नेमलेल्या कंपनीने दीड ते दोन वर्षांत या विभागाला केवळ टोलवाटोलवीची उत्तरे देवून छळ मांडला होता. त्यानंतर हे काम करण्यासच असमर्थता दर्शविली. त्यानंतर हे काम आता १ जानेवारी २0१८ पासून पेन इंडिया कंपनी गुडगाव यांना देण्यात आले आहे. जवळपास १00 वर्षांपूर्वीचे जमिनीचे नकाशे, टिपण उतारे, पोटहिस्सा टिपण उतारे आदींचे यात स्कॅनिंग होणार आहे. यात हिंगोलीत १.६९ लाख, कळमनुरीत-१.७९ लाख, वसमतचे १.२१ लाख, औंढ्याचे १.३५ लाख तर सेनगावचे १.0३ लाख असे ७.0९ लाख पानांचे स्कॅनिंग केले जाणार आहे.